मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यसभेच्या चौथ्या जागेचा तिढा अखेर सुटला असून,राज्यसभेची चौथी जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचा निर्णय घेण्यात येवून,या चौथ्या जागेसाठी फौजिया खान यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.सात जागांसाठी सातच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाली आहे.याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.
राज्यसभेची चौथी जागा राष्ट्रवादीच्या खात्यात गेली आहे. राष्ट्रवादीकडून फौजिया खान यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीकडून आधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसकडून राजीव सातव यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केले.भाजपचे उमेदवार भागवत कराड यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.कालच उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांनी अर्ज भरला आहे.महाराष्ट्र विकास आघाडीच्या वाटपातील राज्यसभेच्या चार जागांपैकी शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा तर राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहेत. सात जागांसाठी महाराष्ट्र विकास आघाडीच्या चार तर भाजपच्या तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने राज्यातील राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाली आहे.