राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ४१ ; मुंबईत एकाचा मृत्यू

मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात आज मुंबई आणि पिंपरी चिंचवड येथे प्रत्येकी एक असे दोन नवे कोरोनाच रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या ४१ झाली आहे. आज मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ६४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

आज मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ६४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.दुबईहून ५ मार्चला परतलेल्या ६४ वर्षीय उच्च रक्तदाबाचा त्रास असलेला हा रुग्ण हिंदूजा रुग्णालयातून संदर्भित करण्यात आला होता.आज राज्यात आणखी २ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी एक रुग्ण मुंबईचा असून हा ४९ वर्षाचा तरुण ७ मार्च रोजी अमेरिकेवरुन परतलेला आहे. तर दुसरा रुग्ण हा पिंपरी चिंचवड येथील महानगरपालिकेच्या भोसरी येथील रुग्णालयात भरती असून हा २६ वर्षीय तरुण १४ मार्च रोजी अमेरिकेहून परतलेला आहे.

पिंपरी चिंचवड मनपा-१०, पुणे मनपा-७, मुंबई – ७, नागपूर – ४, यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण प्रत्येकी ३, आणि रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद येथे प्रत्येकी १ असे एकूण ४१ कोरोनाचे रूग्ण झाले आहेत. राज्यात आज १०५ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण ११६९ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ९०० जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ७७९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत तर ४१ जण पॉझिटिव्ह आले आहेत.बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ११६९ प्रवाशांपैकी ४४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

Previous articleशासकीय कार्यालयांना सुट्टी नाही ;रेल्वे बस सुरू राहणार
Next articleजीवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार,साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई