मुंबई नगरी टीम
मुंबई: करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने मुंबईतील लोकल सह सर्व प्रकारची रेल्वे सेवा येत्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांची वाहतूक करण्याची जबाबदारी शासनाने एसटी महामंडळ व बेस्ट व टाकली आहे. त्यानुसार मुंबईच्या पनवेल,पालघर,आसनगाव,विरार कल्याण , बदलापूर या रेल्वे स्थानकाहून मुंबईतील बोरिवली,वाशी दादर व ठाणे या प्रमुख रेल्वे स्थानकांपर्यत केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांची ने-आण करण्यासाठी एसटीच्या बसेस दर ५ मिनिटांला सुरू ठेवण्यात येणार आहेत. मुंबईतील अथवा ठाण्यातील शहरी भागात जाण्यासाठी बेस्ट बसेसची सोय करण्यात आली आहे.
येत्या ३१ मार्चपर्यंत मुंबईची लाईफ लाईन म्हणजेच लोकल सेवा बंद करण्यात आल्याने जनतेला अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांना प्रवास करण्यासाठी एसटीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल,पालघर,आसनगाव,विरार कल्याण,बदलापूर या रेल्वे स्थानकाहून मुंबईतील बोरिवली,वाशी दादर व ठाणे या प्रमुख रेल्वे स्थानकांपर्यत एसटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यापुढील प्रवासासाठी म्हणजेच शहरातील कार्यालयापर्यंत पोहचण्यासाठी बेस्ट बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.एसटी बसेस पनवेल-वाशी,पनवेल-दादर,पालघर-बोरिवली,विरार-बोरिवली,वाशी-दादर, आसनगाव- ठाणे, कल्याण- ठाणे,कल्याण -दादर,बदलापूर ठाणे,नालासोपारा- बोरिवली या मार्गावर धावतील.याव्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रातील सर्व एसटी बसेस राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार आज रात्रीपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद होणार राहणार आहेत.