राज्यात संचारबंदी ; वाचा कोणत्या सेवा सुरू राहणार

मुंबई नगरी टीम

मुंबई :  कोरोनाच्या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने काल राज्यात जमावबंदी लागू गेल्यानंतर मुंबई आणि पुण्यात झालेल्या रस्त्यांवरील गर्दी पाहता सरकारने अखेर राज्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची आज घोषणा केली आहे.

 संचारबंदीतून जीवनावश्यक वस्तु, औषधे, औषधे निर्माण करणारे कारखाने, दुध, बेकरी,  कृषी उद्योगांशी संबंधित दुकाने,पाळीव प्राण्यांच्या खाद्यांची दुकाने आणि दवाखाने वगळण्यात आली आहेत. टॅक्सी आणि रिक्षा सेवाही बंद राहणार आहेत मात्र अत्यावश्यक सेवेसाठी याचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.परंतु प्रवाशांवर निर्बंध घालण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेमध्येच  खाजगी वाहने रस्त्यांवर उतरतील.  टॅक्सीमध्ये चालक अधिक दोन व्यक्ती तसेच रिक्षांमध्ये चालक अधिक एक व्यक्ती अशी परवानगी  अत्यावश्यक सेवेसाठी देण्यात आली आहे.देशांतर्गत विमान वाहतूक थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना विनंती पत्र पाठवले आहे. शिवाय आणखी एक पाऊल आज उचलण्यात आले आहे.यापूर्वीच महाराष्ट्राच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. आता जिल्ह्याच्या सीमाही सील करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. जिथे विषाणुचा अजुन प्रादुर्भाव झालेला नाही तिथे विषाणु पोहोचू नये  म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आज संपूर्ण राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आरोग्य व्यवस्थेला सज्ज राहण्याच्य सुचना देण्यात आल्या आहेत अंगणवाडी सेविका, आशा, होमगार्ड यांना प्रशिक्षण देऊन यांची मदत घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

घाबरून जाण्याची नसली तरी काळजी घेण्याची वेळ आहे. सरकार जनजागृती करत आहे. अनेक माध्यमे ही काय करावे आणि काय करु नये याची माहिती देऊन सहकार्य करत आहेत. याचे कौतूक करून मुख्यमंत्र्यांनी यासाठी अधिकृत सुत्राद्वारे येणाऱ्या माहितीचाच उपयोग या कामी केला जावा अशी अपेक्षाही व्यक्त केली. परदेशातून आलेल्या आणि ज्यांना होम क्वारंटाईन केले आहे अशा लोकांनी १५ दिवस  समाजाच्या आणि कुटुंबाच्या हितासाठी स्वत:ला वेगळे ठेवावे, बाहेर फिरु नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सायरन वाजला आहे, पुढचे काही दिवस महत्वाचे आहेत त्यामुळे सर्वांनी खुप काळजी घेण्याची गरज आहे, आतापर्यत सर्वांनी सहकार्य केले आहे. भविष्यात हे सहकार्य कायम ठेऊन आपण सर्व मिळून त्यावर मात  असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Previous articleरस्त्यावर गर्दी  करणाऱ्यांवर  कठोर कारवाई करणार : अजित पवार
Next articleअसंघटित व कंत्राटी कर्मचा-यांना आर्थिक मदत जाहीर करा