मुंबई नगरी टीम
मुंबई : दररोज २० लाख गरजू लोकांपर्यंत अन्नधान्य आणि शिधा पोहोचविण्याचा निर्धार आज महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीने केला.राज्यातील सर्व आमदार आणि खासदारांशी आज राज्यातील प्रमुख नेते आणि केंद्रीय मंत्री यांनी संवाद साधला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, व्ही. सतीश, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विजयराव पुराणिक, भाजपाचे सर्व विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य, लोकसभा आणि राज्यसभा सदस्य या ऑडियो ब्रिजला जोडले गेले होते. केंद्रीय मंत्र्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर आमदार, खासदारांनी त्यांच्या मतदारसंघात येत असलेल्या समस्या आणि त्यावर त्यांनी स्थानिक स्तरावर योजलेले उपाय याबाबत माहिती दिली आणि त्यातून अनेक संकल्पनांचे आदानप्रदान करण्यात आले.
केंद्र सरकारकडे ज्या शिफारसी करायच्या आहेत, त्यांचे संकलन नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांच्याकडे करण्यात येणार आहे. जे विषय केंद्र सरकारकडून सोडवायचे आहेत, त्याचा पाठपुरावा हे दोन नेते करतील. हे दोन्ही नेते राज्यातील जिल्हा प्रशासनाच्या सुद्धा संपर्कात आहेत. सॅनेटाईझरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याने त्याला प्रतिबंध करणे आणि इथेनॉलनिर्मिती करणार्या कारखान्यांच्या मदतीने सॅनेटाईझरची मोठ्या प्रमाणात उपलब्धता करून देणे, यासाठी नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी २४ तासात अन्न व औषधी प्रशासनाकडून प्रमाणपत्र मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. शेतक-यांचा शेतमाल तसेच द्राक्ष, संत्रा, केळी आदी नाशिवंत माल वेळेत बाजारात पोहोचविणे यासाठी सुद्धा पुढाकार घेण्यात आला आहे. भाजीपाला आणि फळांची वाहतूक करणार्यांना पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात अटकाव केल्या जात असल्याच्या तक्रारी येत असल्याने लोकप्रतिनिधी स्थानिक प्रशासनाशी समन्वयाने मार्ग काढत आहेत. गाव पातळीवरचे आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स इत्यादींकडून मास्क, गाऊन अशा हेल्थकिटची मागणी मोठ्या प्रमाणात होत असून, पहिल्या टप्प्यात अशा ५ हजार किटची तयारी सुरू झाली आहे. आणखी कुठे गरज असेल तर डॉ. विकास महात्मे यासाठी समन्वय करीत आहेत. रक्तदान शिबिरांसाठी सुद्धा काही आमदारांनी पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकारची आणखी काही रूग्णालयं विलगीकरणासाठी निश्चित करून त्यासाठी केंंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. स्थानिक स्तरावर वृत्तपत्र विक्रेत्यांना सॅनेटाईझर आणि हँडग्लोव्हज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांत सॅनेटाईझर, साबण, मास्क देण्याचा उपक्रम प्रारंभ करण्यात आला आहे. विजबिल भरले नाही म्हणून शेतकरी आणि सामान्यांची वीज कापण्याचे प्रकार सुरू असून, तेथे स्थानिक प्रशासनाशी लोकप्रतिनिधी संपर्कात आहेत. यासंदर्भात राज्य सरकारकडून स्पष्ट दिशानिर्देश जारी करण्याची विनंती यावेळी आमदारांनी केली. बहुतेक दूधसंघांनी आता एकदम भाव कमी करून शेतकर्यांना २० रूपये दर देण्याचा प्रकार सुरू केला असल्याने त्यासंदर्भात सुद्धा राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. केशकर्तन व्यवसायात असणारे, प्लंबर्स, इलेक्ट्रीशियन यांची कुठेही नोंदणी नसते, अशा घटकांसाठी सुद्धा भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले १.७० लाख कोटींचे पॅकेज आणि आज रिझर्व्ह बँकेने सर्व प्रकारच्या बॅँका आणि वित्तीय संस्थांच्या सर्व प्रकारच्या कर्जांचे हप्ते पुढचे तीन महिने लांबणीवर टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. सर्वच घटकांसाठी निर्णय घेण्यात आल्याने आता त्याचे लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी पुढच्या काळात स्वत:ला झोकून द्यावे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.