भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी घेतला महाराष्ट्रातील स्थितीचा आढावा

मुंबई नगरी टीम

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आज महाराष्ट्रातील नेत्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधून राज्यातील एकूण स्थितीचा आणि सेवाकार्याचा आढावा घेतला. केंद्र सरकारशी संबंधित मुद्देही यावेळी प्रामुख्याने मांडण्यात आले.कोरोनाग्रस्तांचा उपचार करणार्‍यांव्यतिरिक्त अन्यही डॉक्टरांना तातडीने सेफ्टिकिट उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आयएमएशी संपर्क करून अन्य रूग्णसेवेची व्यवस्था सुरळीत होईल, याची काळजी घेण्याची गरज आहे, अशी सूचना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

या संवादसेतूमध्ये बी. एल. संतोष, व्ही. सतीश, प्रदेश भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील,विजय पुराणिक आणि भाजपाचे सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.कोरोनाचे संकट अतिशय मोठे आहे आणि त्यामुळे आपण आणखी गतीने काम केले पाहिजे. विशेषत: स्थलांतरित होणारे लोक, शेतकरी, वंचित घटक अशांसाठी अधिक काम केले पाहिजे, असे आवाहन यावेळी जे.पी. नड्डा यांनी यावेळी केले. केंद्र सरकारने मोफत धान्य, शेतक-यांच्या खात्यात थेट मदत,सर्वप्रकारच्या फाईलिंगला मुदतवाढ असे अनेक निर्णय घेतले आहेत. रिझर्व्ह बँकेने तीन महिने सर्व प्रकारच्या कर्जांच्या फरतफेडीला मुदतवाढ दिली आहे. या निर्णयांचे लाभ तळागाळात पोहोचतील, हे कार्यकर्त्यांनी सुनिश्चित करायचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र भाजपाच्या वतीने आता एकूण ७०० मंडळांपैकी ५५० मंडळात प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले असून, कम्युनिटी किचनच्या माध्यमातून लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. दररोज हजारो कार्यकर्त्यांशी संपर्क करून त्याचा आढावा घेतला जात आहे. रक्तदानाची मोहीम सुद्धा वॉर्डश: व्हॉटसअ‍ॅप समूह तयार करून प्रत्येक गरजूंपर्यंत पोहोचण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जिल्हाध्यक्षांनी सुद्धा आपआपले अनुभव आणि केल्या जात असलेल्या सेवाकार्याची माहिती यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना दिली.

Previous articleवळसे पाटलांना दुर्लक्ष नडले ; सोलापूरच्या पालकमंत्रीपदी जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती
Next articleराज्यात आजपर्यंत ६३२३ जणांच्या कोरोनाच्या चाचण्या ; ५९११ चाचण्या निगेटिव्ह