राज्यातील लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवणार ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : देशातील आणि राज्यातील कोरोनाचे संकट दिवसेंनदिवस वाढत असून,राज्यातील प्रमुख महानगरातील कोरोना बाधीत रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून राज्यात असलेला लॉकडाउनचा कालावधी येत्या ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात येणार येणार असल्याची चर्चा आहे.यासंदर्भात येत्या रविवारी निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

देशातील आणि राज्यातील कोरोनाचा सुरू असलेल्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी येत्या १४ एप्रिलपर्यंत राज्यात लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. आता हा कालावधी येत्या चार दिवसात संपुष्टात येणार आहे. सध्या प्रत्येक दिवशी झपाट्याने वाढत असलेली कोरोना बाधीत रूग्णांची संख्या आणि मृत्युंचे प्रमाण पाहता काही राज्यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या देशात सर्वांत जास्त कोरोना रूग्णांची संख्या महाराष्ट्रात म्हणजेच मुंबई शहरात आहे.मुंबई आणि पुणे या महानगरांमध्ये अनेक निर्बंध लादण्यात येवूनही त्याचे पालन होत नसल्याने रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.या पार्श्वभूमीवर केंद्राने  राज्य सरकारकडून अहवाल मागिवला असल्याचे समजते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या  मुंबईत गेल्या काही दिवसांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. तसेच नव्याने काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विसकटली आहे. त्यामुळे अंशत: टाळेबंदी  उठविण्यात यावी अशीही मागणी जोर धरू लागली आहे.तर मुंबई, पुणे,नाशिक,नागपूर सारख्या महानगरांमध्ये लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात येवून ग्रामिण भागात काही प्रमाणात लॉकडाउन शिथील करण्यात यावा असाही मत प्रवाह आहे.सध्या काही जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. हा निर्णयही कायम ठेवण्यात यावा अशीही मागणी होवू लागली आहे.मात्र सध्याची परिस्थिती पाहता संपूर्ण राज्यातील लॉकडाउनचा कालावधी येत्या ३० एप्रिलपर्यंत वाढविला जाण्याची शक्यता आहे.याबाबत येत्या रविवारी अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी देशाला संबोधित करणार असल्याचे समजते.लॉकडाउनचा कालावधी येत्या १४ एप्रिलपर्यंत आहे.त्यानंतर टप्प्याटप्प्याने लॉकडाउन उठवावे तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही,अशा जिल्ह्यांना लॉकडाउनमधून वगळावे, असा सूर राज्यातील काही मंत्र्यांनी यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त झाला होता.

Previous articleदहावी भूगोलचा पेपर घ्यायचा का रद्द करायचा; येत्या सोमवारी होणार निर्णय
Next articleगृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा ; किरीट सोमैयांची मागणी