मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल सदस्यपदी नेमणूक करण्याची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रलंबित ठेवल्याने,सध्या राज्यावर कोरोनाचे संकट असतानाही या वरून राजकीय शिमगा जोरात सुरू आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यासंदर्भात राज्यपालांनी केंद्राकडे सल्ला मागितला असल्याची चर्चा सुरू असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून हल्ला चढविला होता.राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है! असे ट्विट राऊत यांनी करून टिकास्त्र सोडले होते. त्याला माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी प्रतित्युत्तर दिले आहे.राज्यपाल आणि राजभवन यांचे अनन्य साधारण महत्व आहे. खासदारकीची शपथ घेतलेल्या संजय राऊतला माहित नाही काय? सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत. सत्ता चंचल असते आज आहे उद्या नाही. समझने वालों को इशारा काफी है! असा शब्दात राणे यांनी समाचार घेतला आहे.राज्यपाल हे घटनात्मक पद आहे.त्यांना लोकशाहीने जे अधिकार दिलेत त्यानुसार ते निर्णय घेतील.दबाव कशाला आणताय ? लोकशाहीच्या नावाने गळा काढता ना,मग आता लोकशाहीने वागा.पत्रपंडितांनी अकलेचे तुणतुणं वाजवण्याची काय गरज? राजभवनाच्या नावाने बोंबा मारायला शिमगा आहे का? असा टोला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी लगावला आहे.राज्यात कोरोनाचे संकट उभे राहिले असताना राजकारणी मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नसल्याचे चित्र सध्या राज्यात पाहावयास मिळत आहे.