‘या’ माजी मंत्र्यांना हवीय विधान परिषदेची उमेदवारी

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणुक होत असून,या निवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.९ जागा असल्या तरी सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे.इच्छूकांमध्ये विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले आणि उमेदवारी नाकारण्यात आलेल्यांची संख्या मोठी आहे.भाजपच्या वाट्याला चार जागा येत आहेत.मात्र उमेदवारीसाठी  अनेक माजी मंत्री प्रयत्नशील आहेत.

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणुक होत आहे. पक्षीयबलाबलानुसार या ९ जागांपैकी पाच जागा महाराष्ट्र विकास आघाडीच्या तर चार जागा भाजपच्या वाट्याला येणार आहे.नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राष्ट्रवादीला झुकते माप देत दोन जागा दिल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वाट्याला एक तर शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन जागा जाण्याची शक्यता आहे.शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या दोन जागांपैकी एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उभे राहणार आहेत. तर दुसऱ्या जागेवर माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.काँग्रेसकडून माजी मंत्री  नसीम खान आणि सचिन सावंत यांच्या नावाची चर्चा असली तरी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या मोठी असली तरी याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अंतिम निर्णय घेणार आहेत. उर्वरित इच्छुकांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून संधी दिली जाईल.

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे तर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेले  माजी मंत्री एकनाथ खडसे, विनोद तावडे,चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर भाजपच्या कोट्यातून एक जागा रिपब्लिकन पक्षाला द्यावी अशी मागणी  रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी केली आहे.त्यामुळे उमेदवारी  देताना भाजपच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.एका जागेवर निवडून येण्यासाठी २९ मतांची आवश्यकता आहे.त्यामुळे नऊ जागांवर नऊच उमेदवार देऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यावर सत्ताधारी आणि विरोधकांची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.

Previous articleजेव्हा… सुप्रियाताई सुळेंना आर.आर.आबांची आठवण येते 
Next articleजिल्ह्याच्या सीमा आणखी काही दिवस बंदच राहणार