आणि…भाजपचे डमी उमेदवार झाले आमदार

मुंबई नगरी टीम

मुंबई :  विधान परिषदेची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध करण्यात सत्ताधारी आणि विरोधकांना यश आले आहे.मात्र या निवडणूकीत एका उमेदवाराला नशिबाने चांगलीच साथ दिल्याचे पाहवयास मिळाले आहे.भाजपने लातूरचे नेते रमेश कराड यांना ऐनवेळी डमी उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरविले मात्र त्यांना या निवडणूकीत चक्क आमदारकीची लॉटरी लागली आहे.

एकूण ९ जागांसाठी होणारी विधान परिषदेची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली आहे.आज छाननीच्या दिवशी राठोड शेहबाज अलाउद्दीन या अपक्ष उमेदवारांचा अर्ज बाद झाला तर भाजपचे संदीप लेले आणि डॉ. अजित  गोपछडे,  राष्ट्रवादीचे किरण पावसकर,शिवाजीराव गर्जे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.आश्चर्य  म्हणजे ज्या भाजपने पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर केलेले नांदेडचे डॉ. अजित  गोपछडे यांना अचानक उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आल्याने आमदारकीची स्वप्न पाहणारे डॉ.गोपछडे यांच्यावर नाराज होण्याची वेळ आली आणि डमी म्हणून उमेदवारी अर्ज भरलेले  लातूरचे रमेश कराड यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली.

नांदेड शहरात वैद्यकीय व्यवसाय करणारे आणि बालरोग तज्ञ असणारे भाजपचे वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.गोपछडे यांना भाजपने विधान परिषदेवर संधी देण्याचा निर्णय घेवून पहिल्या यादीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.गोपीचंद पडळकर,प्रवीण  दटके, रणजितसिंह विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या सोबत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी लातूरचे रमेश कराड आणि संदीप लेले यांचेही भाजपकडून अर्ज दाखल करण्यात आले.हे दोघे डमी उमेदवार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आज उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशीच मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आणि शेवटी रमेश कराड यांची उमेदवारी कायम ठेवून डॉ. अजित  गोपछडे यांनी माघार घ्यावी असा निर्णय घेण्यात आल्याने अखेर डॉ.गोपछडे यांचे आमदार होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.

लातूरचे रमेश कराड हे दिवंगत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जायचे परंतु लातूर बीड उस्मानाबाद विधानपरिषदेच्या निवडणुकीत त्यांनी भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली होती मात्र अचानक त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता.कराड यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत पुन्हा भाजपला साथ दिल्याने संख्याबळ नसतानाही या मतदार संघातून भाजपचे उमेदवार सुरेश धस यांचा विजय झाला होता.माजी मंत्री पंकजा मुंडे यांना या निवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिली नाही.मात्र त्यांचे सहकारी कराड यांना आमदारकी देवून एक प्रकारे पक्षांतर्गत आव्हान उभे केल्याची चर्चा आहे.

Previous articleविधान परिषद निवडणूक  बिनविरोध;या उमेदवारांनी घेतली माघार
Next articleमद्यप्रेमींसाठी खुशखबर : आता दारू मिळणार घरपोच