मुंबई नगरी टीम
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ जणांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी आणि भाजपच्या सदस्यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ देण्यात आली.
राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घटनांमुळे चर्चेच राहिलेल्या आणि नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह माजी उपसभापती नीलम गो-हे,राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे,अमोल मिटकरी,काँग्रेसचे राजेश राठोड तर भाजपचे गोपीचंद पडळकर,प्रवीण दटके,रणजितसिंह विजयसिंह मोहिते- पाटील आणि रमेश कराड यांची बिनविरोध निवड झाली आहे.त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आल्यानंतर या ९ नवनिर्वाचित सदस्यांना विधान परिषद सदस्यत्वाची शपथ देण्यात आली.विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांसह या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली.यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे,पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेते उपस्थित होते.आमदार म्हणून शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्यातील दुसरे व्यक्ती ठरले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणत्यात सभागृहाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना २७ मे पर्यंत दोन्ही पैकी एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक होते.राज्यातील कोरोनाच्या संकटामुळे रिक्त होणा-या विधान परिषदेच्या ९ जागांच्या निवडणूका केंद्रीय निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकल्याने रिक्त असलेल्या दोन जागे पैकी एका जागेवर राज्यपाल नियुक्त सदस्यपदी मुख्यमंत्री ठाकरे यांची नियुक्ती करावी असा ठराव मंत्रिमंडळाने दोन वेळा करूनही राज्यपालांनी त्यांच्या नियुक्तीस मान्यता न दिल्याने राज्यावर कोरोनाच्या परिस्थितीत राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता होती.यावरून अनेक आरोपप्रत्यारोप करण्यात आले.उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा रंगली होती. मात्र राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील विधान परिषदेच्या निवडणूका घेण्याची विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून केली होती.त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला होता.केंद्रीय निवडणूक आयोगाने ९ जागांसाठी २१ मे रोजी मतदान घेण्याची घोषणा केली होती.९ जागांसाठी केवळ ९ अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.

















