मुंबई नगरी टीम
पुणे : भाजपच्यावतीने उद्या राज्यभर माझं आंगण रणांगण हे आंदोलन करण्यात येणार असून,हे आंदोलनाच्या माध्यमातून मोदी-शहा यांच्यासमोर स्वतःचे अस्तित्व दाखवण्याची केविलवाणी धडपड भाजप नेते करू पाहत असल्याचा करतानाच, या कठीण काळात काळे कपडे घालून,काळ्या फिती लावून जनतेला सरकारविरोधात आंदोलन करायचे आवाहन करणाऱ्या ‘कोथरूडच्या जननायकाचे’ मन किती काळे आहे हेच दिसून येतंय अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचे सांगत सरकारला जागे करण्यासाठी भाजपाने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून उद्या शुक्रवारी राज्यभर भाजपच्यावतीने माझं आंगण रणांगण हे आंदोलन करण्यात येणार आहे.आता भाजपच्या या आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला आहे.चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना पाठवलेले पत्रकच चाकणकर यांनी आपल्या फेसबुकवर प्रसिद्ध करून भाजपवर निशाणा साधला आहे. आंदोलनाच्या माध्यमातून मोदी-शहा यांच्यासमोर स्वतःचे अस्तित्व दाखवण्याची केविलवाणी धडपड भाजप नेते करू पाहत असल्याची टीका करतानाच, या कठीण काळात काळे कपडे घालून,काळ्या फिती लावून जनतेला सरकारविरोधात आंदोलन करायचे आवाहन करणाऱ्या ‘कोथरूडच्या जननायकाचे’ मन किती काळे आहे हेच दिसून येत असल्याचा टोला चाकणकर यांनी लगावला आहे.
चंद्रकांतदादा हरकत नाही आंदोलन करा,पण या आंदोलनात कार्यकर्त्यांना काळजी घ्यायला सांगा,कोणाला कोरोनाची लागण होऊ नये हि प्रार्थना,काही कमी जास्त झालेच तर महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आणि त्यांची वैद्यकीय यंत्रणा २४ तास उपलब्ध आहे. आपण विरोधक आहात हे मान्य आहे.पण विरोध कोठे,कधी आणि कोणत्या परिस्थितीत करावा किमान याचं भान कोल्हापूरहून कोथरूडला आलाच आहात तर आतापर्यंत पुणेकरांकडून शिकायला हवं होतं,असा टोलाही चाकणकर यांनी पाटलांना लगावला आहे.चंद्रकांतदादा, आपण सगळ्यांनी सरकारला साथ देत या बिकट परिस्थितीत कोरोनाशी लढायला हवं होतं,दुदैव आपण महाराष्ट्रातील जनतेशी लढत आहात,ज्यांनी या कालावधीत कोरोना यौध्दा म्हणून काम केलं त्यांचा आपण अपमान करीत आहात असेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चाकणकर यांनी सुनावले आहे.