मुंबईतील खासगी रुग्णालयांत पालिकेचे अधिकारी नियुक्त करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोना उपाययोजनांवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली.मुंबईतील खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या ८० टक्के बेडस राखीव ठेवण्याच्या शासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे यासाठी अशा सर्व रुग्णालयांमध्ये पालिकेने अधिकारी नियुक्त करून नियंत्रण करावे व रुग्णांची हेळसांड होणार नाही असे पाहावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले

याप्रसंगी पालिका आयुक्त आय.एस. चहल यांनी गेल्या काही दिवसांत मुंबईत बेडस व इतर साधन सामुग्रीची कशी वाढ करण्यात आली आहे आणि यामुळे संक्रमण रोखण्यात आपल्याला कसे यश मिळत आहे असे सांगितले. प्रत्येक बेडला युनिक आयडी देणार, डायलिसीस रुग्णांना यापूढे उपचार मिळणार, प्रयोगशाळाना २४ तासात चाचणी अहवाल देणे बंधनकारक करणार असे सांगून आयुक्त चहल म्हणाले की मुंबईत रुग्ण दुपटीचा वेग १९ दिवसांवर गेला आहे.  कोविड योद्धा म्हणून डॉक्टर्स, परिचारिका पुढे येत आहेत. ३७५० डॉक्टर उपचारांसाठी उतरत आहेत. ४५० डॉक्टर्स पैकी ६० जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे . मुंबईत सध्या २१ हजार ऍक्टिव्ह रुग्ण आहेत असे त्यांनी सांगितले. आजमितीस देशाच्या एकूण रुग्ण संख्येच्या ३५.२३ टक्के रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. देशाच्या तुलनेत ३१.१९ टक्के रुग्ण सुधारण्याचे प्रमाण आहे. महाराष्ट्रात मृत्यू दर ३.३७ टक्के असून देशाचा मृत्यू दर २.८२ टक्के आहे. जगात दर दहा लक्ष लोकांमागे ७७८ मृत्यू असताना महाराष्ट्रात हे प्रमाण ४८ इतके आहे. आज महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमध्ये मृत्यू दर ६.१८ टक्के, पश्चिम बंगाल मध्ये ५.६ टक्के, मध्य प्रदेशात ४.३२ टक्के इतका जास्त आहे. एकवेळेस राज्यातील मृत्यू दर ७.५ टक्के होता तो कमी होऊन ३.३७ टक्के इतका खाली उतरला आहे.

राज्यातील ३० ते ४० वयोगटात कोरोना लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ४० टक्के तर ४० ते ५० वयोगटात ते १८ टक्के आहे. ५० ते ६० वयोगटात ते १६.५ टक्के आहे. मृत्यू पावलेल्या ३२ टक्के रुग्णांना इतर कोणतेही आजार नव्हते. ६७ टक्के लोकांमध्ये इतर आजारही होते. मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४१.३३ टक्के तर ठाण्यात ३६.५९ टक्के आहेमहाराष्ट्र राज्यात आत्तापर्यंत ४.५ लक्ष चाचण्या झाल्या आहेत. राज्यात ३६३१ चाचण्या दर दश लक्ष झाल्या असून देशात २६२१ चाचण्या होतात. केवळ आंध्र आणि तामिळनाडू राज्यांत आपल्यापेक्षा जास्त चाचण्या होत आहेत.पूर्वी राज्यात एकूण झालेल्या चाचण्यांपैकी १८ टक्के पॉझिटिव्ह होत होते आता ते कमी होऊन १५.५ टक्के झाले आहे. सध्या राज्यात केवळ १४०० रुग्ण गंभीर आहेत अशी माहितीही बैठकीत देण्यात आली. सध्या ७० लाख चाचण्या राज्यात घेण्यात आल्या आहेत . एकूण १८ हजार पथके यासाठी नियुक्त करण्यात आली होती. यावेळी वैठकीत ८० टक्के बेड्सची अंमलबजावणी रुग्णालयांनी काटेकोरपणे करावी,रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करण्यासाठी खासगी रुग्णवाहिका सुद्धा अधिग्रहीत कराव्यात, रुग्णालयांमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांना येणे सोयीचे जावे म्हणून उपनगरीय रेल्वे सेवा त्यांच्यासाठी सुरू करण्याकरिता पाठपुरावा करावा आदी बाबींवर मंत्रिमंडळ सदस्यांनी सूचना मांडल्या.

Previous articleराज्यातील २७ हजार सरपंचांना मिळणार ५० लाखांचे विमा कवच
Next articleराज्यातील सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ