विधानसभेत पराभूत झालेल्यांना विधान परिषदेवर संधी देवू नका

मुंबई नगरी टीम

मुंबई :  नुकत्याच रिक्त झालेल्या राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ जागांवर विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांना संधी देवू नका अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अशा नेत्यांची शिफारस राज्यपाल नियुक्तीसाठी करू नये,अशी विनंती काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या कार्यकर्त्यांकडून होत असल्याचे सांगण्यात येते.तर एखाद्याचा पत्ता कापण्यासाठी या मागणीचा आधार घेतला जाऊ शकतो, अशी भीती एका माजी आमदारांनी व्यक्त केली आहे.

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने अमोल मिटकरी यांना आमदार केल्याने त्याची खदखद अजून पक्षात आहे. मिटकरी यांच्याप्रमाने विधानसभा निवडणुक प्रचारात राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून  गणराज्य संघटनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या घणाघाती भाषणातून भाजपवर टीका केली होती. प्रभावी आणि निर्भिड वक्त्या असल्यामुळे  राष्ट्रवादीकडून  त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा असल्यामुळे आता बाहेरच्यांना संधी देऊ नका,पक्षातील जेष्ठ कार्यकर्ते आणि नेत्यांचीच विधानपरिषदेवर वर्णी लावावी,अशी मागणी  राष्ट्रवादीकडून केली जात असल्याचे सांगण्यात येते.विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यपालांकडून  रिक्त झालेल्या बारा जागांवर नियुक्ती केली जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आता पक्षांतर्गत कुरबुरीला सुरूवात झाली असल्याची चर्चा आहे.एकीकडे कार्यकर्त्यांनी ही मागणी लावून धरली असतानाच दुसरीकडे राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ जागावर आपली वर्णी लावावी, यासाठी काँग्रेसकडून १४६ इच्छुकांनी अर्ज केले असल्याचे समजते.तर नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणूकीवेळी राष्ट्रवादीकडे इच्छुकांची ५० निवेदने आली होती.त्यामधूनच राज्यपाल नियुक्तीसाठी शिफारस केली जाणार असल्याचे सांगण्यात येते.

राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या  १२ जागांसाठी  राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसने एकाही नावाची राज्यपालांकडे शिफारस केलेली नसली तरी सत्ताधारी पक्षाच्या वाट्याला प्रत्येकी चार जागा येणार आहेत.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माजी आमदार कल्याण काळे,मोहन जोशी आणि मुजफ्फर हुसेन यांच्या नावाची तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आणि पापा मोदी यांच्या नावाची शिफारस केल्याचे समजते.पृथ्वीराज चव्हाण यांनी राजेंद्र मुळक, शिवराज पाटील चाकूरकर यांनी बसवराज पाटील,मिलिंद देवरा यांनी माजी मंत्री नसीम खान तर खासदार राजीव सातव यांनी हरिश्चंद्र सकपाळ आणि सत्संग मुंडे यांच्या नावासाठी आग्रह धरला असल्याचे सांगण्यात येते.प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष चारुलता टोकस यांच्यासह आशिष देशमुख,माणिकराव ठाकरे, चरणसिंह सप्रा यांनीही राज्यपाल नियुक्तीसाठी पक्षाकडे विनंती केली असल्याचे समजते.राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील,विलास लांडे,आणि गुलाबराव देवकर तसेच पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे, राष्ट्रवादी महिला प्रदेश काँग्रेस अध्यक्षा रूपाली चाकणकर,ठाणे जिल्ह्यातील नेते नजीब मुल्ला यांनी यापूर्वीच पक्षाकडे उमेदवारी मागितली असल्याचे समजते.

Previous articleचंद्रकांतदादा.. आपण कोणाबद्दल बोलतोय याचे तरी भान ठेवा !
Next articleउदय सामंत यांच्या प्रयत्नांना यश ; रत्नागिरीत होणार वैद्यकीय महाविद्यालय