मुंबई नगरी टीम
मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठविल्यानंतर आज अखेर राज्य सरकारला अतिरिक्त १३२८ कोरोना बळींची नोंद अधिकृतपणे घ्यावी लागली.मुंबईत ८६२ आणि अन्य जिल्ह्यांतील ४६६ कोरोना मृत्यू आज जाहीर करण्यात आले.असे एकूण १३२८ मृत्यू हे अधिकचे कोरोनाचे मृत्यू म्हणून आता नोंदले जातील. यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की,माझी राज्य सरकारला विनंती आहे की, या प्रक्रियेला आकड्यांच्या फेरपडताळणीचे गोंडस नाव न देता, गेल्या ३ महिने ही आकडेवारी लपविणा-यांवर काय कारवाई करणार, हे सांगितले गेले पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे.
काल फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून गेल्या तीन महिन्यांपासून काही कोरोनामृत्यू होऊन सुद्धा ते प्रत्यक्ष आकडेवारीत दाखविले जात नसल्याबद्दल तक्रार केली होती. आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने कारोना बळी कसे नोंदवायचे, याचे स्पष्ट दिशानिर्देश दिले असल्याने ही कार्यकक्षा डेथ ऑडिट कमिटीची कशी काय होऊ शकते? ही समिती मृत्यूसंख्या कमी करण्यासाठी आहे की, मृत्यूसंख्या दडपण्यासाठी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. अखेर आज राज्य सरकारने हे १३२८ मृत्यू अधिकचे असल्याचे मान्य केले आणि फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब झाले.