मुंबई नगरी टीम
मुंबई : जगभरात आज फादर्स डे साजरा केला जात आहे. विविध माध्यमातून जगातील प्रत्येक माणूस आपल्या वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहे.राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही आपले वडील राजारामबापू यांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
जयंत पाटील अवघ्या २१ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे छत्र हरवले होते.जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज फादर्स डे निमित्ताने त्यांनी ट्विटरवर पोस्ट करून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत एक पत्र लिहिले आहे.त्यांनी आपले वडील राजारामबापू यांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात…
प्रिय दादा,
सारा महाराष्ट्र तुम्हाला ‘बापू’ म्हणून ओळखतो, पण आम्ही तुम्हाला घरात ‘दादा’ म्हणायचो. मला तुम्ही आठवता ते म्हणजे सतत महाराष्ट्रातील जनतेसाठी कष्ट करणारे नेते म्हणून. तुमची तीच छबी माझ्या मनात कायम आहे. सातारा जिल्हा स्कूल बोर्डाचे अध्यक्ष, स्वातंत्र्यानंतर सांगली जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष ते महाराष्ट्राचे एक प्रमुख नेते असा आपला प्रवास. लहानपणापासून मी आपला लाडका होतो. ‘खोटं बोलायचं नाही, वावगं वागायचं नाही, कोणी दुखावले जाईल असे शब्द बोलायचे नाहीत’ ही तुम्ही दिलेली शिकवण मला रोजच आठवते. तुमच्या प्रेरणेने मी राज्यात काम करत असलो, तरी आजही राज्यात लोक मला राजारामबापूंचा मुलगा म्हणून ओळखतात आणि तीच ओळख मला जास्त प्रिय आहे. आम्ही लहानपणी अभ्यास केला नाही की तुम्ही म्हणायचा, ‘नीट शिकला नाहीस तर कासेगावला म्हसरं राखायला जाव लागेल’ आणि मग आम्हाला लगेच अभ्यासाचे महत्त्व समजायचे. नैतिकता, सचोटीने वागायला देखील तुम्हीच शिकवलं, जगाच्या कोणत्याच विद्यापीठात मिळणार नाही, असे शिक्षण आम्हाला तुमच्या आयुष्याकडे पाहून मिळाले.
मी एकवीस वर्षांचा होतो, तेव्हा आपण आम्हाला सोडून गेलात. तुमच्या मार्गदर्शनापासून मी वंचित झालो,याची खंत वाटते. तुम्ही दिलेली संस्कारांची वाट कधीच सोडणार नाही.
Happy Father’s day, Dada!
तुमचाच,
जयंता