शरद पवारही चीनच्या घुसखोरीमुळे चिंतीत असतील

मुंबई नगरी टीम

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय बोलले,त्याची पूर्ण स्पष्टता नाही, मात्र त्यांच्या एखाद्या विधानावरून माध्यमांनी निष्कर्षापर्यंत पोहोचून पंतप्रधानांना क्लीनचिट आणि राहुल गांधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावण्याचा आतताईपणा करू नये.मला खात्री आहे, शरद पवार ही चीनच्या घुसखोरीमुळे चिंतीत असतील असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

भारत-चीन संघर्षावरून केंद्र सरकारवर काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल साता-यात वक्तव्य केले होते.राष्ट्राच्या सुरक्षेवरून राजकारण करू नये असा सल्ला त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दिला होता.या वक्तव्याचा आधार घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यामांनी पवार यांच्या एखाद्या विधानावरून निष्कर्षापर्यंत पोहोचून पंतप्रधानांना क्लीनचिट आणि राहुल गांधी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावण्याचा आतताईपणा करू नये असे सुनावले आहे.शरद पवार काय बोलले, त्याची पूर्ण स्पष्टता नाही, पवारही चीनच्या घुसखोरीमुळे चिंतीत असतील याची मला खात्री आहे,असेही थोरात यांनी म्हटले आहे.

थोरात म्हणाले की,चीन प्रश्नी काँग्रेस पक्ष सरकारसोबत आहे. मात्र त्याचा अर्थ राष्ट्रहिताचे मुद्दे मांडू नये असा होत नाही. सीमा सुरक्षेबाबत मा. राहुलजी गांधी सरकारला प्रश्न विचारणे हे राजकारण नाही तर जनतेने दिलेली जबाबदारी आहे.१९६२ व आजच्या परिस्थितीची तुलना होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावे.४५ वर्षात चीन सीमेवर आपला एकही जवान शहीद झाला नव्हता.गलवान खो-यात चीनच्या आगळीकीमुळे आपले २० जवान शहीद झाले. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सीमेत कोणीही घुसले नाही म्हणत आहेत. त्यांच्या या विधानाचा आधार घेऊन चीन आपल्या शहीदांना घुसखोर ठरवत आहे. याचे दु:ख काँग्रेस प्रमाणे शरद पवार यांनाही असेलच राहुल गांधी हे जनतेच्या मनातील प्रश्न सरकारला विचारत आहेत. राहुल गांधी यांची चिंता ही देशाच्या अखंडतेशी सबंधित आहे. आजही मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांनी चीनच्या आगळीकीबद्दल चकार शब्दही काढला नाही. अशावेळी गप्प बसून कसे चालेल?भाजपने काँग्रेसच्या सुचनांकडे आणि प्रश्नांकडे राजकारण म्हणून बघू नये! प्रश्न देशाच्या अखंडतेचा आहे, त्यामळे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष प्रश्न विचारणारच आहे.

Previous articleपरिक्षा न देता विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर त्यांना समाधान लाभणार नाही
Next articleराज्यातील “या” जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन