मुंबई नगरी टीम
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली असून, विधानसभा निवडणूकीत उमेदवारी नाकारलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री विनोद तावडे यांना या कार्यकारिणीत केवळ विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आले आहे.तर दुसरीकडे नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना आज जाहीर करण्यात आलेल्या राज्य कार्यकारिणीत स्थान देण्यात आले नाही.पक्षाच्या पातळीवर केंद्रात त्यांना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
दर तीन वर्षानी स्थानिक पातळी ते राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक बदल होतात त्यानुसार आज नव्या नियुक्त्या जाहीर होत असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.विधानसभा निवडणूकीनंतर भाजपातील अनेक नेते नाराज होते. त्यामुळे नवी कार्यकारिणी कशी असेल याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती.विधानसभा निवडणूकीत उमेदवारी नाकारण्यात आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे,मंत्री विनोद तावडे,चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या आणि नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर कोणती जबाबदारी सोपविली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.या पैकी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर महामंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री विनोद तावडे यांना या कार्यकारिणीची केवळ विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आले आहे.तर पंकजा मुंडे यांना केंद्रात त्यांना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी स्पष्ट केले.
माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,आमदार देवयानी फरांदे, माजी मंत्री रविंद्र चव्हाण,श्रीकांत भारतीय, सुजित सिंह ठाकूर यांच्यावर महामंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.विजय पुराणिक यांची महामंत्री संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.माजी मंत्री राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे,माधव भंडारी, माजी आमदार सुरेश हळवणकर,खासदार प्रीतम मुंडे,आमदार प्रसाद लाड, चित्रा वाघ, माधवी नाईक,खासदार कपिल पाटील, खासदार भारती पवार, जयप्रकाश ठाकुर अशा १२ जणांवर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.विधानसभेत मुख्य प्रतोद हे आशिष शेलार आणि माधुरी मिसाळ असतील,भाजपाचे मुख्य प्रवक्ते म्हणून केशव उपाध्ये यांना जबाबदारी देण्यात आली आहे.