मुंबई नगरी टीम
सोलापुर : येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन होणार असून,त्यानंतर मंदिराच्या कामाला सुरूवात होणार आहे.या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे.राम मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा, असा टोला पवार यांनी लगावला आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना येत्या ५ ऑगस्ट रोजी आयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच या मुद्द्यावरून आज सोलापूर दौ-यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीकास्त्र सोडले आहे.जर राम मंदिर बांधून करोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा, अशा शब्दात पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.सोलापूर मधील कोरोना परिस्थिती आणि सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी शरद पवार आज सोलापुर दौ-यावर होते.या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.
कोरोना महामारी हे देशावरचे सर्वात मोठे संकट आहे. त्यावर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांनी एकत्रितपणे समन्वय साधून काम केले पाहिजे.कोरोना संकटावर मात करण्यासाठी कोणत्या गोष्टींना महत्व द्यावे हे प्राध्यान्याने ठरविले पाहिजे.मंदिर बांधून कोरोनाचे संकट दूर होईल असे कोणाला वाटत आहे असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी मोदी यांना लगावला.मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा.मात्र करोनाचे संकट दूर व्हावे हीच आमची इच्छा आहे असे पवार म्हणाले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे.याकडे केंद्र आणि राज्य सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट करताना, कोरोना नियंत्रणासाठी राज्य आणि केंद्र सरकारने आरोग्यमंत्र्यांना अधिक मदत करण्याची गरज असल्याचे पवार यांनी नमूद केले. सोलापूर हे संकटावर मात करणारे शहर असून, जेव्हा प्लेगची साथ आली होती. त्यावेळीही प्लेगवर मात करणाऱ्या ठिकाणांमध्ये सोलापूरचा समावेश होता अशी आठवणही पवार यांनी यावेळी सांगितली.