मुंबई नगरी टीम
मुंबई : १०० युनिट पर्यंत वीज बिल माफ करण्याचे सरकारचे उर्जामंत्री नितिन राऊत यांनी घोषणा केली होती त्याचे काय झाले. त्यामुळे वीज बिल तात्काळ माफ करण्याची भाजपची मागणी असून, एमईआरसीने कोरोनाच्या काळात वीज बिलामध्ये जे छुपे दर लावले आहेत ते रद्द करण्यात यावेत व कोरोनाच्या काळात कोणाचीही वीज तोडू नये अश्या मागण्या भाजपच्या वतीने बेस्ट महाव्यवस्थापकाकडे मांडण्यात आल्या असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली
मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली बेस्टमध्ये काल आंदोलन करण्यात आले. पण हे सरकार या विषयावर गंभीर नाही,म्हणून आज आम्ही वीज बिलाची होळी करित सरकाराला इशारा दिला आहे.त्यामुळे सर्वसामान्यांच्या वीज बिलाचे वाढीव छुपे कर सरकारने तात्काळ माफ करावेत,१०० युनिट पर्यंत वीज ग्राहकांना मोफत द्यावी अशी आमची मागणी असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली. कोरोना टाळेबंदी काळात लोकांचे उत्पन्न कमी झालेले असताना वीज दरात सवलत देण्याऐवजी जनतेला वाढीव वीज देयके पाठविण्यात आली आहेत. तसेच वाढीव देयके न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची बेस्ट कडून देण्यात आलेली धमकीच्या निषेधार्थ आज नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयाच्या समोर बेस्ट वीज बिलांची होळी करण्यात आली व बेस्टचा कृतीचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, भाजप मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार राहुल नार्वेकर, मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांच्यासह भाजपचे नगरेसविक, नगरसेविका मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.