मुंबई नगरी टीम
मुंबई : होय..आमचे सरकार तीनचाकीच आहे. रिक्षाच आहे ती गरीबांची…मात्र स्टिअरिंग माझ्या हातात, आणि पाठीमागे दोघे बसले आहेत,असे स्पष्ट करतानाच माझ्या सरकारचे भवितव्य विरोधी पक्षाच्या हातात नाही,असा घणाघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी राम मंदिर बुलेट ट्रेन,मंत्रालय आदी विषयावर सडेतोड उत्तरे दिली आहेत.
सरकार तीनचाकीच आहे.रिक्षाच आहे, ती गरीबांची आहे. मात्र त्याचे स्टिअरिंग माझ्या हातात आहे. आणि पाठीमागे दोघे बसले आहेत. हे सत्य मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोकळेपणाने मान्य केले,मात्र माझ्या सरकारचे भवितव्य विरोधी पक्षाच्या हातात नाही असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीत केला आहे. हे तीनचाकी सरकार आहे यावर प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, हो ना,पण ते गरीबांचे वाहन आहे. बुलेट ट्रेन की रिक्षा यात निवडायचे झाले तर मी रिक्षाच निवडेन. मी गरीबांच्या मागे उभा राहीन. ही माझी भूमिका मी बदलत नाही. कोणी असा समज करून घेऊ नये की, आता मी मुख्यमंत्री झालो म्हणजे बुलेट ट्रेनच्या मागे उभा राहीन, असे सांगतानात आपण बुलेट ट्रेनच्या मागे उभे राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मी एवढंच म्हटलंय,मी मुख्यमंत्री या नात्याने सर्वांगीण विचार करेन.सगळय़ांच्या मताने बुलेट ट्रेन नको असेल तर मी करणार नाही असे सांगून बुलेट ट्रेनला विरोध असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.राज्यातील सरकार हे तीन चाकी आहे,ते एका दिशेने चालत आहे तर मग तुमच्या पोटात का दुखतंय असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
राज्यातील सरकार हे तीन चाकी असल्याची टीका केली जाते यावर,केंद्रात किती चाकाचं सरकार आहे ? असा टोलाही त्यांनी या मुलाखतीत लगावला आहे. मी जेव्हा गेल्या वेळी एनडीएच्या मीटिंगला गेलो होतो तेव्हा तर 30-35 चाकं होती. म्हणजे रेल्वेगाडी होती अशा शब्दात त्यांनी केंद्रातील सरकारचा समाचार घेतला. महाविकास आघाडी मधील कुरबुरीबाबत बोलताना मुख्यमंत्री यांनी आपली भूमिका मांडली,कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन-तीन महिन्यांत प्रत्यक्ष गाठीभेटी अवघड झाल्या आहेत. काही मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली. अशा परिस्थितीत भेटीगाठ अवघड झाल्या आहेत. त्यामुळे फोनवरून किंवा व्हिडीओच्या माध्यमातून गाठीभेटी सुरू आहेत.या संकटात एकत्र एकाच ठिकाणी बसणे सध्या तरी शक्य नाही. जनतेला आम्ही कायदे सांगायचे आणि आम्हीच ते मोडायचे हे बरोबर नाही. त्यामुळे आम्ही ही खबरदारी घेत आहोत.मंत्रिमंडळाच्या बैठकीही व्हिडीओच्या माध्यमातून घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या संकटात कुठेही सरकारचे काम थांबलेले नाही,रस्त्यांची धरणांची, कोस्टल रोड, ग्रामीण भागात काही प्रकल्प,कापूस खरेदी, ही कामे सुरू आहेत.कोणताही कामे थांबलेली नाहीत.संकट आहे म्हणून हातावर हात ठेवून स्वस्थ बसलो नाही,तर अशा परिस्थितीत १६ हजार कोटींचे करार केले असल्याचे त्यांनी सांगितले.मंत्रालयाचे सचिवालय झालेले नाही,असे सागंत,धारावीचे कौतुक, राज्याचे कौतुक, सर्वोत्तम मुख्यमंत्री हे कौतुक होत आहे. ते कौतुकास्पद काम नोकरशाहीने सरकारचे न ऐकता केले आहे का ? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.निर्णय घेण्याचा अधिकार सरकारचा आहे हे पण त्यांची अंमलबजावणी सचिवांकडून करून घ्यायची असते. शेवटी यंत्रणा राबवण्याची हिंमत तुमच्यात पाहिजे असेही त्यांनी सांगितले.या या मुलाखतीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बाबतही भाष्य केले. शरद पवार यांच्या सोबतच्या भेटी हा एक वेगळा अनुभव असतो. ते आपल्या भेटीत त्यांचे जुने अनुभव सांगत असतात.लातूरला भूकंप झाला तेव्हा त्यांनी काय केले होते असे सांगून अनुभवांच्या आठवणी ते सांगत असतात असे त्यांनी एका प्रश्नावर उत्तर दिले.विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी साखर प्रश्नावर दिल्ली दौरा केला त्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी भाष्य करीत टोला लगावला.ते देशातल्या साखर कारखानदारांबद्दल चिंता करत असतील.शेवटी घरा मध्ये साखरही लागते ना,गृहमंत्री म्हणजे त्यांना कदाचित आदेश बांदेकर जसे कार्यक्रम करतात तसे गृहमंत्री वाटले असतील, अशा शब्दात त्यांनी शहा- फडणवीस भेटीचा समाचार घेतला.