मुंबई नगरी टीम
मुंबई : महाराष्ट्रासह, बंगाल आणि पंजाब या तीन राज्यांची देशाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली असून, या तीनही राज्यांकडे देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे असे महत्वपूर्ण वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सरहद संस्थेने आयोजित केलेल्या महाराष्ट्र बंगाल मैत्री पर्वाचे औपचारिक उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हस्ते झाले. त्यावेळी त्यानी हे महत्वपूर्ण मत व्यक्त केले. छोटेखानी कार्यक्रमात चित्रपट निर्माते, अभिनेते,आदी मान्यवर उपस्थित होते.लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दी निमित्त १ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या या पर्वाने १ ऑगस्टपासून महाराष्ट्र आणि बंगालमध्ये साहित्य,कला,संस्कृती आणि समाजकारणाच्या संबंधांना उजाळा देण्यात येणार आहे.
लाल-बाल-पाल या तिघांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला नवा आयाम दिला.या तिघांचे भारताच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान आहे.त्यामागे संत नामदेवांनी सुरू केलेल्या वैचारिक देवाण-घेवाणीची परंपरा आहे. रवींद्रनाथ टागोर यांचे मोठे बंधू सत्येंद्रनाथ टागोर हे महाराष्ट्रात पोलीस अधिकारी होते. त्यांनी संत तुकारामांचे अभंग बंगाली भाषेत केले. तर सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणास्थान हे छ.शिवाजी महाराज होते.महाराष्ट्रातल्या साहित्यिकांवरही रवींद्रनाथ टागोरांचा मोठा प्रभाव होता असे पवार यांनी यावेळी सांगितले.साहित्य,चित्रपट संगीत या क्षेत्राचा समृद्ध वारसा बंगालला आहे. महाराष्ट्रानेही या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे.महाराष्ट्र बंगाल मैत्री पर्वाच्या निमित्ताने आदान-प्रदानाच्या प्रक्रियेत सर्वांनी सहभागी झाले पाहिजे, असेही पवार यावेळी म्हणाले.
काँग्रेस पक्षाची स्थापना होत असताना त्यावेळी देशात प्लेगची साथ आली होती.या कारणामुळे त्यावेळी पुण्याला होणारे अधिवेशन मुंबई मध्ये घ्यावे लागले होते. तशीच काहीशी परिस्थिती आज असल्याचे पवार यांनी सांगितले.महाराष्ट्र बंगाल मैत्री पर्व हा कार्यक्रम पुण्यामध्ये होणार होता मात्र सध्याच्या कोरोना संकटामुळे तो मुंबईत होत आहे असेही पवार यांनी सांगितले.या संकटामुळे माणसांना माणसांपासून दूर ठेवणारा सध्याचा सामाजिक अंतराचा काळ आहे. या काळात दोन राज्यांना जवळ आणण्याच्या उपक्रमाची सुरुवात होते असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.