कोरोना चाचणी झाली स्वस्त ; खासगी लॅबमध्ये १९०० रूपयात होणार चाचणी

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रति तपासणी ३०० रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी १९००, २२०० आणि २५०० रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्य शासनाने समिती नेमून काही दिवसांपूर्वी कोरोना चाचण्यांचे दर निश्चित केले होते. रुग्णालयातून रुग्णाचा स्वॅब घेतला त्यासाठी २२०० रुपये दर आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेऊन तपासणी केली तर त्यााठी २५०० रुपये आकारायचा निर्णय झाला होता. काही व्यक्ती, रुग्ण स्वत: थेट प्रयोगशाळेत जाऊन तपासणी करतात त्यांच्याकडून २८०० रुपये आकारले जात होते. अशा वेळी त्यांच्याकडून २८०० रुपयांऐवजी २५०० रुपये आकारावेत असे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले.

मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील लॉकडाऊनमध्ये काही ठिकाणी शिथिलता आणण्यात आली आहे. त्यामुळे चाचण्यांसाठी लागणारे रिएजंटस्, व्हीटीएम कीट व पीपीई किट यांची उपलब्धता वाढल्याने त्यांच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे तपासणी खर्चात कपात होणे आवश्यक होते. याबाबी लक्षात घेऊन प्रयोगशाळा व किटस् उत्पादकांशी चर्चा करून समितीने शिफारशींसह आपला अहवाल शासनला सादर केला. त्यानुसार चाचण्यांचे पुन्हा सुधारीत दर निश्चित करण्यात आले.

त्यामुळे आता सॅम्पल घेऊन त्याची वाहतूक आणि सॅम्पलचे रिपोर्टीग त्याकरीता २२०० रुपयांऐवजी १९०० रुपये आकारण्यात येईल. तर स्वॅब कलेक्शन सेंटर, कोरोना केअर सेंटर्स, क्वारंटाईन सेंटरमधील येथून स्वॅब घेतल्यास २५०० रुपयांऐवजी २२०० आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास २५०० रुपये सुधारीत दरानुसार आकारण्यात येणार आहेत.

Previous articleवाचा : आजच्या मंत्रिमंडळ बैठक घेतले हे सात महत्वपूर्ण निर्णय  
Next articleसुशांत सिंह आत्महत्या प्रकरण : राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वादग्रस्त विधानाने खळबळ