मुंबई नगरी टीम
मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळवून देणारे आणि उत्तरेतील राज्यात पक्षाच्या प्रचारातील हुकमी एक्का असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.प्रभारीपदी फडणवीस यांची नियुक्ती होत असली तरी त्याचा सर्वात जास्त आनंद काँग्रेस राष्ट्रवादीला झाला आहे.फडणवीसांच्या संभाव्य नियुक्तीवरून काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना खोचक टोला लगावत भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
लवकरच बिहार मधील निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे.महाराष्ट्रात भाजपाला घवघवीत यश मिळवून देणारे, गुजरात दिल्ली, मध्यप्रदेश आदी उत्तरेतील राज्यात पक्षाचा प्रचार करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिहार भाजपचे प्रभारीपद सोपविले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.फडणवीस यांची ही नियुक्ती भाजप आणि फडणवीस यांच्यासाठी आनंदाची बातमी असली तरी याचा सर्वात जास्त आनंद राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना झाल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होते.कोरोनाच्या संकट काळात फडणवीसजींच्या बिहार मधील नियुक्तीमुळे महाराष्ट्राच्या जनतेला प्रचंड दिलासा मिळेल.भाजपाने महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला त्याबद्दल धन्यवाद! सन्माननीय फडणवीसजींना शुभेच्छा- “दिल्याघरी सुखी रहा” असा खोचक टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रात भाजपचे सत्ता स्थापनेचे स्वप्न भंग झाले आहे. त्यामुळे फडणवीसांची नियुक्ती बिहारमध्ये केली जात आहे, अशा शब्दात राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टोला लगावला आहे.तर देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेता सुशांतसिंग राजपुत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली.यानंतर त्यांना आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारचे प्रभारीपद देण्यात येत आहे. यावर बोलताना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी हा योगायोग असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.