मुंबई नगरी टीम
जालना : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता.यावर बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे द्या, कारवाई करू, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोप यांनी दिली आहे.जालनामध्ये माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही भूमिका मांडली.
“भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे द्यावेत. त्यावर नक्कीच कारवाई होईल. तो तसा कायदा आहे”, असे राजेश टोपे म्हणाले. काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पंधरा टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिका-यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला, असा गंभीर आरोप केला होता. तसेच याची सीबीआयकडून चौकशी करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली होती. त्यामुळे विरोधकांकडून या नव्या वादाला तोंड फोडण्यात आले आहे. यावर आज माध्यमांनी राजेश टोपेंना प्रश्न विचारला असता पुरावे द्या, कारवाई करू, असे टोपेंनी म्हटले.
दरम्यान, राजेश टोपे यांना सध्या पवार कुटुंबाविषयी सुरू असलेल्या मुद्द्यावर देखील प्रश्न विचारण्यात आला. यावर टोपे म्हणाले, “पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या घरात एकोपाच असतो. माध्यमांनी याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करू नये”, असे आवाहन त्यांनी केले. “पार्थ पवार माझा मित्र आहे. शरद पवार, अजित पवार आणि पार्थ पवार एकत्र बसून हा विषय एका मिनिटात संपवतील”, असे टोपे म्हणाले.