दाभोळकरांच्या हत्येनंतर राज्यात तुमचेच सरकार होते,पवारांना भातखळकरांचे प्रत्युत्तर

मुंबई नगरी टीम

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याप्रकरणाचा तपास जसा सीबीआयकडून सुरू आहे. तशी परिणती सुशांत प्रकरणाच्या तपासात दिसू नये, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांना लगावला आहे. मात्र यावर शांत बसतील ते विरोधत कसले. यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर देत डॉ नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येनंतर चौदा महिने राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार होते याचा आपल्याला विसर पडलेला दिसतो, असा पलटवार केला आहे. तसेच पार्थ पवारांच्या भूमिकेवरूनही शरद पवारांना टोला लगावला आहे.

“शरद पवारांना मी आठवण करून देऊ इच्छितो,डॉ नरेंद्र दाभोळकरांची दुर्दैवी हत्या झाल्यानंतर तब्बल चौदा महिने राज्यात तुमच्या पक्षाचे सरकार होते. आणि तुमच्याच पक्षाचे गृहमंत्री होते. या कालखंडामध्ये पुरावे नष्ट करण्याचे काम झाले, असेही सीबीआयचे म्हणणे आहे. त्यामुळे शरद पवारजी जर का आपण आपल्या कवडी मोलाचीही किंमत नसलेल्या नातवाचे ऐकले असते तर, अशा खोचक पद्धतीने आणि खोटे बोलण्याची पाळी आज आपल्यावर आली नसती. आता सीबीआयकडे तपास गेला आहे. सीबीआय शंभर टक्के याचा तपास लावेल याची महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला खात्री आहे”, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. त्यानंतर आज शरद पवारांनी या प्रकरणावरील निकालाबाबत आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी डाॅ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याप्रकरणाचा सीबीआयकडून सुरू असलेल्या तपास प्रक्रियेवर लक्ष वेधले. अप्रत्यक्षपणे केलेली हो बोचरी टीका विरोधकांसांठी होती. यावर आता भातखळकर यांनी प्रत्युत्तर देत हा मुद्दा पुन्हा राष्ट्रवादी, काँग्रेस जवळ वळवला आहे.

Previous articleउत्तर प्रदेश पोलिसांनी रोखल्यानंतर नितीन राऊतांचे ठिय्या आंदोलन
Next articleमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात प्रशिक्षण झालेल्या ५४२ उमेदवारांना नेमणूक देणार