मुंबई नगरी टीम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय नेतृत्वाची मानसिकता असून त्यांनी बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व करावे,असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. यावर भाजप खासदार नारायण राणे यांनी खोचक टोला लगावत प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्र सांभाळत येत नाही, आणि चालले देशातील दुसरी राज्य सांभाळायला”, असे ट्विट नारायण राणे यांनी केले आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून नारायण राणेंची हे सरकार कधी पडणार अशी भविष्यवाणी सूरूच आहे. ठाकरे सरकारमध्ये समन्वय नाही. हे सरकार ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये पडेल,असा दावा राणेंकडून करण्यात आला होता. तर सध्या सिनेक्षेत्रासह राजकारणात गाजत असलेल्या सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून विरोधक ठाकरे सरकारवर शरसंधान साधताना दिसत आहेत. यात नारायण राणे महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वारंवार लक्ष्य करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या ट्विट मधून देखील संजय राऊत यांना प्रतिक्रिया देत थेट उद्धव ठाकरेंना टोल लगावला आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी बोलावलेल्या बैठकीत महाराष्ट्रासह इतर सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकारला घाबरायचे की त्यांच्या विरोधात लढायचे हे आधी ठरवा, असे सांगितले. तसेच आपले धोरण आधी निश्चित करायला हवे, असे देखील उद्धव ठाकरे यांनी सुचवले. तर या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरेंच्या कामाची प्रशंसा देखील केली होती. या बैठकीविषयी आज संजय राऊत यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्यांनी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करावे, असे मत व्यक्त केले होते.