मुंबई नगरी टीम
पुणे : अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात,असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर यावर अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत करत ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.केवळ युवा सेनेच्या आग्रहा खातर राज्य सरकार एकतर्फी निर्णय घेत होते, असा टोला फडणवीस यांनी लगावला पुण्यात कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
युवासेनेने जी याचिका केली होती ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे न्यायालयाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना फायदा होईल. परीक्षेशिवाय पदवी देऊ शकत नाही हे न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे. देशभरातील कुलगुरुंचे देखील हेच म्हणणे होते. जी कमिटी नेमली होती त्यांनीही हाच अहवाल दिला होता. तरी देखील केवळ युवा सेनेच्या आग्रहाखातर राज्य सरकार सातत्याने एकतर्फी निर्णय घेत होते. त्यामुळे भविष्यात आमच्या मुलांवर परिणाम झाला असता, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणीस यांनी दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अतिंम वर्षाच्या परिक्षांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. कोरोनाच्या परिस्थितीमुळे परीक्षा न घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता. त्याला अनेक विद्यार्थी संघटनांनी देखील पाठिंबा दिला होता. मात्र परिक्षा घ्याव्यात असे ठाम मत विद्यापीठ अनुदान आयोगाने मांडले होते. त्यानंतर परिक्षांचा हा मुद्दा न्यायालयात गेला. तर आज त्यावर निकाल देण्यात आला आहे. त्यामुळे कोविड काळात परीक्षा घेण्यासाठी राज्यांची कसोटी लागणार आहे.