मुंबई नगरी टीम
कोल्हापूर : आपली अकार्यकक्षमता लपवण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. त्यामुळे आपली लढाई ही मोदी सरकारशी नव्हे तर कोरोनाशी आहे, हे मुख्यमंत्र्यांनी समजून घेतले पाहिजे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. शनिवारी कोल्हापूर दौ-यावर असताना त्यांनी येथील कोरोनो स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी साधलेल्या संवादात त्यांनी सरकारला कोरोनाकडे लक्ष घालण्याचा सल्ला दिला आहे.
“आपली लढाई मोदी सरकारशी नव्हे तर कोरोनाशी आहे हे मुख्यमंत्र्यांनी समजून घेतले पाहिजे. त्यामुळे कोरोनाशी लढायचे की घाबरायचे, असा विचार आधी करणे आवश्यक आहे, त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. केवळ राजकारणाकडे लक्ष द्यायचे आणि प्रत्येक गोष्टीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मध्ये आणायचे. आपली अकार्यक्षमता लपवण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवणे, हे एकच काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. पण लोकांना त्यांची अकार्यक्षमता दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यासह या सरकारने समजून घेतले पाहिजे की, आपली लढाई मोदी यांच्याशी नाही”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. उलट पंतप्रधान आपल्याला मदत करत आहेत. सर्वात जास्त पीएम केअर फंडाचे इक्विपमेंट आणि पैसे महाराष्ट्राला मिळाले असल्याचे देखील फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस यांना मंदिरे खुली करण्याबाबत देखील प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “केंद्र सरकारच्या निकषानुसार अनेक राज्यांत धार्मिक स्थळे खुली करण्यात आली. मात्र महाराष्ट्र सरकार दारूची दुकाने उघडत आहेत. परंतु धार्मिक स्थळे खुली करण्यास त्यांना अडचणी येत आहेत. धार्मिक स्थळे खुली केल्यानंतर कोरोना पसरला अशा घटना कुठे घडलेल्या नाही. त्यामुळे अशी परिस्थितीत आपण,मॉल,दारूची दुकाने उघडू शकतो, तर धार्मिक स्थळे खुली करण्यात अडचण काय?”, असा सवाल फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला आहे.