शिवसेना इतकी निर्बुद्ध नाही,कंगना प्रकरणात शिवसेनेच्या भूमिकेवर मनसेचा सवाल

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोणीतरी प्रसिद्धीसाठी फेकलेल्या जाळ्यात अडकण्याइतकी शिवसेना निर्बुद्ध नाही. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी शिवसेना मुद्दाम कंगनाच्या प्रसिद्धीच्या जाळ्यात अडकत आहे का ?, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. कंगनाच्या बेताल व्यक्तव्यावर शिवसेना घेत असलेली आक्रमक भूमिका सध्याच्या घडीला खरच योग्य आहे का?, असा प्रश्नही संदीप देशपांडे यांनी केला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

संदीप देशपांडे म्हणाले, “भाविकांच्या मंदिर प्रवेशाला बंदी आहे,लाखो लोक बेरोजगार आहेत. आरोग्याची व्यवस्था चांगली नसल्याने हजारो लोकांचे बळी जात आहेत. मुख्यमंत्री घरातच बसून काम करत असल्याने जनतेमध्ये नाराजी आहे. रेल्वेसेवा चालू नसल्यामुळे लोकांचे प्रवासाचे भयंकर हाल होत आहेत. या सगळ्या परिस्थितीवरून लक्ष हटवण्यासाठी ज्या व्यक्तीची आणि तिच्या वक्तव्याची पाच पैशांची किंमत नाही. अशी व्यक्ती काही वादग्रस्त व्यक्तव्य करत प्रसिद्धीसाठी जाळे फेकत आहे. या प्रसिद्धीच्या जाळयात अडकण्याइतकी शिवसेना निर्बुद्ध नाही.या सगळ्यावरून लक्ष हटवण्यासाठी शिवसेना हे मुद्दाम करत आहे का? यावर लक्ष केंद्रित झाले पहिले, असे संदीप देशपांडे म्हणाले. “लोकांच्या त्रासावरून लक्ष विचलित करण्याचे हे षडयंत्र नाही ना याचा विचार माध्यमांनी आणि जनतेने करायला हवा”, असे आवाहन संदीप देशपांडे यांनी केले आहे.

मागील दोन महिन्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी वृत्तवाहिनीचे संपादक याच शिवसेनेचे वाभाडे काढत होते. तेव्हा अख्खी शिवसेना गप्प होती.मग आत्ताच या सगळ्याचा उद्रेक का होत आहे, याचा नक्की विचार करायला हवा.या षडयंत्रामध्ये कोणकोण आहे याचाही विचार करायला हवा,त्यामुळे आपण सगळे सुज्ञ आहात याचा विचार नक्की कराल”, असेही संदीप देशपांडे म्हणाले. कंगनाच्या वक्तव्यानंतर मनसेही आक्रमक झालेली पाहायला मिळाली. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मुंबई पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा कंगनाला दिला होता. तसेच कंगनाला फारसे महत्त्व देण्याची गरज नाही, असेही अमेय खोपकर यांनी म्हटले आहे.

Previous articleअमृता फडणवीसांना कंगनाचा पुळका म्हणाल्या,पोस्टरला चपलांनी मारणे योग्य नाही!
Next articleमी माझ्या विधानावर ठाम,कितीही वेळा तुरुंगात जायला तयार !