मुंबई नगरी टीम
नवी मुंबई : कृषी विधेयकावरून काँग्रेसची भूमिका ही दुटप्पी असून निव्वळ राजकारण याठिकाणी केले जात असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काँग्रेसच्या या दुटप्पी भूमिकेचे उत्तर शेतकरीच त्यांना देतील. त्यामुळे या विधेयकाची अंमलबजावणी त्यांना करावीच लागेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. नवी मुंबईत माध्यमांशी साधलेल्या संवादात ते बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केंद्राच्या कृषी विधेयक आणि कामगार कायद्याचे जोरदार समर्थन करण्यात आले आहे.
याविषयी अधिक बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,”कृषी विधेयकावर निव्वळ राजकारण याठिकाणी केले जात आहे. या विधेयकाची अंमलबजावणी न करणे हे शेतकरी विरोधी आहे. काँग्रेस पक्ष इतका दुटप्पी आहे की, त्यांनी आपल्या २०१९ च्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सत्तेवर आलो तर या सगळ्या गोष्टी करू, असे म्हटले होते. मग त्यांनी त्या जाहीरनाम्यात असेही म्हटले पाहिजे होते की, जर आम्ही सत्तेवर आलो नाही तर, दुसऱ्या पक्षाला हे करू देणार नाही. त्यामुळे ही दुटप्पी भूमिका आहे. पूर्णपणे चुकीचे आहे. काँग्रेसला याचे उत्तर शेतकरीच देतील याची अंलबजावणी त्यांना करावीच लागेल”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नुकत्याच बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी आधीच निवडणुकीतील विजयाचे भाकीत केले आहे. “निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमाणे कोरोना काळात अतिशय मोठी ही निवडणूक आहे. एकप्रकारचे हे आव्हान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बिहारमधील सामान्य माणसांचा जो विश्वास आहे. त्यासोबत नितीश कुमार, सुशील मोदीजी यांच्या सरकारने केलेले जे काम आहे. यामुळे बिहारमध्ये प्रचंड मोठा विजय एनडीएला त्या ठिकाणी मिळेल”, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.