एकनाथ खडसे कोणत्याही पक्षात गेले तरी चालेल, पण भाजपमधून जाणे महत्त्वाचे

मुंबई नगरी टीम

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शिवसेनेत आले, राष्ट्रवादीत किंवा काँग्रेसमध्ये गेले तरी आम्हाला आनंद आहे. पण एकनाथ खडसे भाजपमधून जाणे हा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते  आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत चर्चा सुरू आहे.यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. जळगावात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. एक लीडर म्हणून त्यांची पत आहेच. ३० वर्षे ते आमदार राहिले असून मंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. ते शिवसेनेत आले, राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये गेले तरी आम्हाला आनंद आहे. एकनाथ खडसे भाजपमधून गेले हा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा रंगली आहे. दोन दिवसांपूर्वी खडसे मुंबईत देखील आले होते. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरील चर्चेला अधिक जोर आला होता.

मुंबईत एकनाथ खडसे शरद पवारांची भेट घेणार असल्याची चर्चाही रंगली होती. पंरतु अशी कोणतीही भेट होणार नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट करत भेटीचे वृत्त फेटाळले. तरीही एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा काही थांबण्याचे नाव घेत नाही. दरम्यान, गुलाबराव पाटील यांना बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने स्टार प्रचारक म्हणून संधी दिली आहे. यावरही त्यांनी भाष्य करत हा जळगाव आणि खान्देशचा सन्मान असल्याचे त्यांनी म्हटले. तर आपण निश्चितच पक्षासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला.

Previous articleजितेंद्र आव्हाडांसह ठाकरे सरकारमधील तिघांचे विकेट पडणार !
Next articleमुख्यमंत्री महोदय जागे व्हा, मातोश्रीच्या बाहेर पडा, खा. नवनीत राणांचे टीकास्त्र