मुख्यमंत्री महोदय जागे व्हा, मातोश्रीच्या बाहेर पडा, खा. नवनीत राणांचे टीकास्त्र 

मुंबई नगरी टीम

अमरावती :  मुख्यमंत्री महोदय जागे व्हा, मातोश्रीच्या बाहेर पडा, असे म्हणत अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांना आदिवासींच्या समस्यांकडे लक्ष घालण्याची मागणी केली आहे. यावेळी नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी स्वतः परतवाडा ते धारणी असा ९० किमीचा प्रवास एसटीने करत आदिवासींच्या समस्या जाणून घेतल्या. मुंबईत एसी बस चालवल्या जात असून मेळघाटात जुन्या बसेस चालवल्या जात आहेत. आदिवासींच्या जीवाशी होणार हा खेळ त्वरित थांबवून किमान सुखरूप प्रवास होईल, अशी व्यवस्था राज्य शासनाने करावी अशी मागणी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी केली आहे.

यावेळी त्यांनी आपल्या एसटी प्रवासातील एक व्हिडिओ देखील पोस्ट करत याबाबत भाष्य केले. “आज जर आपण या बसची अवस्था पाहिली, तर संपूर्ण महाराष्ट्रातील खराब झालेल्या ज्या बसेस असतात त्या आमच्या मेळघाटात पाठवून देतात. २० वर्षे जुनी असलेली बस मेळघाटातील शेतकरी आणि आदिवासी लोकांसाठी पाठवतात. या बसची हालत जर आपण पाहिली, तर अतिशय खराब आहे. एसटी चालक आणि कंडेक्टर यांचे गेल्या सहा महिन्याचे पगार देखील झाले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, बाहेर पडा. बाहेर लोक कशी जगत आहेत. चालक, कंडेक्टर दिवसरात्र लोकांना सुविधा देत आहेत, त्यांचे पगार का झाले नाहीत? त्याचा विचार आपण का करत नाही”, असा सवाल नवनीत राणा यांनी केला आहे.

दरम्यान, याधीही देखील नवनीत राणा यांनी आदिवासींचा विकास लक्षात घेत मेळघाटातील रेल्वेमार्गाचा मुद्दा लोकसभेत उचलून धरला होता. तर आता त्यांनी मेळघाटात धावणाऱ्या एसटी बसेसची अवस्था समोर आणली दिली आहे. त्यामुळे इथल्या लोकांना अशा अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. याकरता आदिवासींच्या सुखरूप प्रवासाची व्यवस्था राज्य सरकारने करावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.

Previous articleएकनाथ खडसे कोणत्याही पक्षात गेले तरी चालेल, पण भाजपमधून जाणे महत्त्वाचे
Next articleमंदिर बंद,उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार! : चंद्रकांत पाटील