मुंबई नगरी टीम
पुणे : संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारने बार सुरु आणि मंदिर बंद असे चित्र उभे केले आहे असा टोला लगावतानाच, राज्यातील प्रमुख धर्माचार्य, विविध संप्रदायांचे साधु-संत,अनेक धार्मिक व आध्यात्मिक संघटना यांच्यातर्फे १३ ऑक्टोबर रोजी मंदिरे सुरू करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टीचा या उपोषणाला पाठिंबा असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभागी व्हावे,अशी सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
पाटील म्हणाले की,गेल्या साडेसहा महिन्यांपासून बंद असलेले मंदिराचे दरवाजे उघडावेत याकरिता भाविकांनी अनेकवेळा मागणी केली,राज्यव्यापी घंटानाद आंदोलन केले, तरीही महाविकास आघाडी सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही.उलट राज्यात मदिरेचे बार उघडण्यात आले. मंदिर बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार!, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या समन्वयातून १३ ऑक्टोबर रोजी राज्यभर विविध ठिकाणी प्रमुख मंदिरांसमोर सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत भाविकांतर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. विविध संप्रदायाचे साधु-संत, धर्माचार्य, पुरोहित उपोषणात सहभाग होणार आहेत. फूल-प्रसाद विक्रेते, मंदिरांवर उपजीविका अवलंबून असलेले सर्व व्यावसायिक हे सुद्धा उपोषणात सहभागी होणार आहेत. या लाक्षणिक उपोषणाला भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण पाठिंबा आहे. भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपोषणात सक्रीय सहभागी होतील. कार्यकर्त्यांनी कोरोनासबंधीचे सर्व नियम पाळून सहभागी व्हावे.