सध्या देशात केवळ दोनच राज्यपाल,संजय राऊतांचा भगतसिंह कोश्यारींवर पुन्हा निशाणा

मुंबई नगरी टीम

मुंबई : “सध्या देशात केवळ दोनच राज्यापाल आहेत. एक महाराष्ट्र तर दुसरे पश्चिम बंगालमध्ये. बाकी कुठे राज्यापाल आहेत की नाही हे मला माहित नाही”, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. मंदिरांसदर्भातील मुद्द्यावरून ते भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्रातून करण्यात आलेला हिंदुत्वाचा उल्लेख यावरून राज्यापाल आणि सत्ताधारी पक्ष यांच्यातील दरी अधिकच वाढली आहे. तर संजय राऊत यांनी राज्यपालांच्या भूमिकेवरून त्यांना पुन्हा चिमटा काढला आहे.

संजय राऊत यांनी म्हटले की, “राज्यापाल हे केंद्र सरकार आणि राष्ट्रपती यांचे एजंट असतात. कारण ते पूर्णपणे राजकीय काम करतात. सध्या देशात केवळ दोनच राज्यपाल आहेत, एक महाराष्ट्रात तर दुसरे पश्चिम बंगालमध्ये. तिथली जी सरकारे आहेत ती विरोधकांची (केंद्रातील सत्ताधा-यांची) सरकारे आहेत”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. दरम्यान, गुरुवारी देखील माध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी राज्यपाल धर्मनिरपेक्ष आहेत की नाही? हे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी विचारले पाहिजे, असा सवाल उपस्थित केला होता. तसेच राजकीय भूमिका घेऊन काम करणे हे राज्यपाल पदाला योग्य नाही, अशी टीकाही त्यांनी केली होती.

महाराष्ट्रात ठाकरे सरकार आल्यापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतलेल्या अनेक भूमिकांमुळे दोघांमध्येही वाद निर्माण झाले आहेत. मग ते विधानपरिषदेच्या निवडणुका असो किंवा अंतिम वर्षाच्या परिक्षेचा विषय असो यात सत्ताधारी आणि राज्यापाल यांच्यात अनेकदा खटके उडताना पाहायला मिळाले. तर सध्या राज्यात मंदिरे खुली करण्याची मागणी भाजपने उचलून धरली असताना राज्यपालांनी याचसंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र धाडले. या पत्रात हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरे यांना सवाल करण्यात आला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ठाकरे शैलीतच या पत्राला उत्तर दिले. यावरून भाजपचे नेते आक्रमक झाले असून त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीक केली आहे. तर राज्यपालांच्या अशा भूमिकेवर नाराजी दर्शवत राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले आहे. या सर्व घडामोडीवर आता पंतप्रधान काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Previous articleमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नाही
Next articleएकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर काय म्हणाले अजित पवार ?