मुंबई नगरी टीम
मुंबई : एकनाख खडसे हे उद्या अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. नुकतेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसेंनी महाविकास आघाडीत प्रवेश केला ही चांगली गोष्ट असल्याचे थोरात म्हणाले. तर भाजपमधील अनेकजण घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले आहे. त्यामुळे आता कोणता नवा राजकीय भूकंप पाहायला मिळणार याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.
बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी इतकी वर्षे काम करूनही पक्षाने त्यांची दखल घेतली नाही. त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. तसेच भाजपमध्ये अस्वस्थता पसरली असून तिथे गेलेले अनेकजण परत येण्याच्या प्रयत्नात असल्याचा खुलासाही थोरातांनी केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीसह काँग्रेसमध्येही इनकमिंग होणार का अशी चर्चा आहे. तर भाजपमधील ही गळती महाविकास आघाडीसाठी फायद्याची ठरू शकते.
एकनाथ खडसे यांनी देखील आपला राजीनामा दिल्यानंतर अनेक मोठे खुलासे केले आहेत. भाजपमधील १० ते १२ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा खडसेंनी केला आहे. तर अनेक माजी आमदार आपल्यासोबत शुक्रवारी राष्ट्रवादी प्रवेश करणार अशी माहीती देखील त्यांनी दिली. दरम्यान, भाजपकडून आपली बाजू सावरली जात असली तरी, एकनाथ खडसे यांच्या जाण्याने उत्तर महाराष्ट्रात पक्षाला खिंडार पडले हे नाकारता येणार नाही. तर खडसेंपाठोपाठ आणखी कोणत्या भागात भाजपला असा हादरा सहन करावा लागेल हे येणारा काळच ठरवेल.