मुंबई नगरी टीम
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून घरीच स्वतःला विलग करून घेतले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील काही नेत्यांसह पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता.अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी करत त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी खबरदारी म्हणून स्वतःची कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटले की, “लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे”. देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच अतिवृष्टी झालेल्या भागांचा पाहणी दौरा केला होता. शिवाय बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभारी म्हणून त्यांनी अनेक दौरेही केले होते. या दरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील तब्येत ठीक नसून ते सध्या घरीच विश्रांती घेत आहेत.सर्दी आणि ताप असा त्रास त्यांना जाणवला. त्यामुळे त्यांनी खबरदारी म्हणून आपली कोरोनाची चाचणी करून घेतली होती, जी निगेटिव्ह आली. पंरतु अजित पवार हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त माध्यमांत झळकले होते. मात्र हे खोटे असल्याचे म्हणत पार्थ पवार यांनी अफवांचे खंडन केले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अजित पवारांनी आपले सर्व दौरे रद्द केले आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.