कितीही टरटर केली तरी आकाश फाटणार नाही, पाऊस काही पडणार नाही: नवाब मलिक

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चालले असून,कॉंग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष त्यांची विचारधारा सोडून सरकारमध्ये सामील झालेले नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे.त्यावर जोरदार प्रत्युत्तर नवाब मलिक यांनी दिले आहे.धर्माच्या आधारावर राजकारण करणे हा आमचा कार्यक्रम नाही.भाजप धर्माच्या आधारावर राजकारण करुन मतांचे राजकारण करत असल्याचे राज्यातील जनतेला माहित आहे. असा टोला   मलिक यांनी भाजपला लगावला आहे. शिवसेना आणि भाजप या दोघांच्या वादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्य परिस्थितीचा भाजपाला आरसा दाखवला आहे. वेगवेगळे भाष्य करुन भाजप जनतेची दिशाभूल करण्याचे काम कसे करतेय हे दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवाय राज्यपाल व आणि भाजपचे नेते जनतेची दिशाभूल कशी करत आहेत हे उघडपणे लोकांसमोर मांडले आहे असेही मलिक म्हणाले.

कुणीही कितीही टरटर केली तरी आकाश काही फाटणार नाही आणि पाऊस काही पडणार नाही असा जबरदस्त टोला मलिक यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला आहे.दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर    भाजप नेत्यांनी पत्रकार परिषदा घेऊन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. या टीकेला मलिक यांनी चांगलेच उत्तर दिले आहे.भाजपचे काही नेते मुख्यमंत्र्यांच्याबाबतीत अपशब्द वापरत आहेत. आणि एक मंत्री तुरुंगात जाणार असल्याचे भाकीत करत आहेत हे बोलणं योग्य नाही असे नवाब मलिक म्हणाले.सभ्य समाजात आणि राजकारणात असंसदीय शब्दांचा प्रयोग होत असेल तर तो चुकीचा आहे. प्रत्येकाने मर्यादेत राहून भाषेचा प्रयोग केला पाहिजे असा सल्ला मलिक यांनी दिला आहे.

Previous articleमहाराष्ट्राशी बेईमानी करून हे मुख्यमंत्री झाले ; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Next articleबाळासाहेबांच्या नावाने अजून किती दिवस पोळ्या भाजणार ?