मुंबई नगरी टीम
कोल्हापूर : राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे जवळपास निश्चित झाली आहेत. अंतिम मंजुरीसाठी ती लवकरच राज्यपालांकडे पाठवली जाणार आहेत. पंरतु विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस आणि राज्यपाल यांनी सरकारकडून येणार ही १२ नावे बाजूला काढण्याचे ठरवले आहे, असा गंभीर आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा गौप्यस्फोट केला.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा दाखल देत मुश्रीफ यांनी हा गंभीर आरोप केला आहे. हसन मुश्रीफ यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
यावर अधिक बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याचे माजी मंत्री विनय कोरे यांच्या घरी चंद्रकांत पाटील आले होते. त्यादिवशी विधान परिषदेची यादी राज्यपालांकडे जाणार अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. यावर चर्चा झाल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचे बोलणे झाले आहे. राज्यपालांशी त्यांची चर्चा झाली आहे. सरकारकडून आलेली यादी बाजूला काढून ठेवण्याचे ठरलेले आहे, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच विनय कोरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या गप्पा सुरू होत्या तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन कार्यकर्ते तिथे उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी मास्क लावले होते त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी त्यांना ओळखले नाही, असे हसन मुश्रीफ म्हणाले.
दरम्यान, हे सर्व दुर्दैवी असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. राज्य शासनाचे निर्णय अडवायचे, यापूर्वी आम्ही अध्यादेश काढले ते अनेक परत आले आहेत. कुठल्याही बिलावर लवकर सह्या होत नाहीत, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. ज्या प्रमाणे भेटीगाठी होत आहेत. त्यानुसार राज्य सरकारच्या विरोधी लोकांना राजभवन कधी इतका वेळ देत होते, असे कधी दिसले नाही, असे म्हणत हसन मुश्रीफ यांनी राज्यपालांवर टीका केली. तसेच राज्यपालांना बदलण्याची मागणी महाविकास आघाडी करू शकते का? या प्रश्नाला उत्तर देताना हसन मुश्रीफ म्हणाले, ही गोष्ट मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर घातल्यानंतर निर्णय घेऊ, असे सूचक विधान त्यांनी केले.