नांदेडचा निकाल भाजपची लाट ओसरल्याची नांदी
नवाब मलिक
मुंबई दि.12 नांदेड महानगरपालिकेत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवल्यामुळे भाजपची लाट आता ओसरली आहे. देशात कमळ, राज्यात कमळ, मनपात कमळ, असे भाजपचे घोषवाक्य ठरले होते. हा भ्रम नांदडेच्या जनतेने धुळीस मिळवल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
‘पार्टी विथ डिफरन्स’ असा टेंभा मिरवणाऱ्या भाजपने नांदेड मनपाच्या निवडणूकीत सर्व नैतिकता बाजुला ठेवून, पैसा, शक्ती पणाला लावली होती. लोहा कंधारचे शिवसेना आमदार चिखलीकर हे भाजपच्या प्रचाराचे प्रमुख होते. तसेच दोन दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत आमचेच जास्त सदस्य निवडून आल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत होता. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीतला जो आकडा भाजपने दिला तो फसवा होता. नांदेडच्या मतदानावर परिणाम व्हावा, म्हणून खोटे आकडे देण्यात आले. तरी नांदेडच्या जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली असल्याची टीका मलिक यांनी केली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांच्या टेंपल इंटरप्रायजेस या कंपनीच्या वार्षिक उलाढालीत १६ हजार पटींनी वाढ झाली आहे. ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. मात्र आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षाच्या मुलाने मंदिराच्या नावावर भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे. माध्यमे जेव्हा एखाद्या कंपनीबाबत भ्रष्टाचाराची बातमी देतात, तेव्हा त्या कंपनीला खुलासा मागण्याचा अधिकार असतो. पण जय शहा यांच्या खाजगी कंपनीचा बचाव करण्यासाठी खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल समोर आले आहेत, याचाच अर्थ दाल मे कुछ काला असल्याची टीका मलिक यांनी केली. पीयूष गोयल हे रेल्वेमंत्री असण्याऐवजी जय शहा यांच्या कंपनीचे चार्टर्ड अकाऊंटंट असल्यासारखे बचाव करत आहेत.
जय शहा यांच्या टेम्पल इंटरप्रायजेस लिमिटेडमध्ये घोटाळा झाला असल्यास ते चौकशीअंती समोर येईल, परंतु पीयूष गोयल यांच्यासह कायदे मंत्री रविशंकर प्रसाद आणि सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल कंपनीचे बाजुने उभे राहिले आहेत. सरकारचे कायदा विषयक सल्लागार असतानाही अतिरिक्त सॉलिसिटर जनरल जय शहा यांचा खटला लढत आहेत. सॉलिसिटर जनरलपदाचा दुरुपयोग केल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी मलिक यांनी केली.
तसेच जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही, तोपर्यंत रेल्वे व कायदे मंत्री यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले पाहीजे, अशी मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत ६ व ७ नोव्हेंबर रोजी कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार, जि.प. अध्यक्ष अशा जवळपास ३०० महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली असल्याचे मलिक यांनी सांगितले. देशभरात सध्या असलेले वातावरण व राज्याच्या परिस्थितीवर चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.