मनसेच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी; कुठून आला फोन ?

मुंबई नगरी टीम

पुणे : पुणे पदवीधर निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असताना एक धक्कादायक माहिती सामोर आली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फोनवरून धमकी देणारी संबंधित व्यक्ती ही साताऱ्यातील आहे.रुपाली पाटील-ठोंबरे यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,सातारा येथील लबाडे आडनाव असलेल्या व्यक्तीने रुपाली पाटील यांना धमकी दिली आहे तू जिथे असशील तिथे संपवून टाकू, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस,अशी धमकी संबंधित व्यक्तीने दिली आहे. या धमकीच्या फोननंतर रुपाली पाटील यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत धमकी देणाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

राज्यात विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी डिसेंबर महिन्यात निवडणूक होत आहे. पुण्यातही पदवीधर निवडणुकीसाठी भाजप, महाविकास आघाडी आणि मनसेमध्ये चुरस रंगली आहे. या मतदारसंघातून भाजपकडून संग्रामसिंह देशमुख, महाविकास आघाडीकडून अरुण लाड, तर मनसेकडून माजी नगरसेविका रूपाली पाटील यांच्यासह अनेकजण निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अशातच मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना आलेल्या धमकीच्या फोनमुळे एकच खळबळ माजली आहे.

Previous articleअमित शाहांनी सांगितले म्हणून मनपा शिवसेनेसाठी सोडली होती; चंद्रकांत पाटलांचा खुलासा
Next articleऊर्जामंत्री नितीन राऊतांनी राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्कचे काम करावे