आम्ही सरकार पडण्याची वाट पाहत बसलेलो नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई नगरी टीम

पुणे : आज आम्ही सक्षम विरोधी पक्षाच्या भूमिकेत असून,सरकार पडण्याची वाट पाहत बसलेलो नाही.असे सांगतानाच अशी अनैसर्गिक सरकारे फार काळ चालत नाहीत.ज्यादिवशी हे सरकार पडेल,त्यादिवशी एक सक्षम सरकार राज्याला देऊ असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळीं त्यांनी हे वक्तव्य केले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान राज्यात भाजपकडून सुरू असलेल्या राजकारणाविषयी नाराजी व्यक्त केली होती. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे तक्रार करण्यापुरता का होईना पण भाजपच्या आंदोलनाची दखल घेतली याचा आनंद आहे,असे त्यांनी म्हटले.तर आजपर्यंत इतकी पत्रे मुख्यमंत्र्यांना पाठवली, परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही, असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींकडे तक्रार केली असली तरी विरोधी पक्ष म्हणून जनतेचे प्रश्न मांडणे हे आमचे काम आहे. राज्य सरकार मनमानी कारभार करणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, जनतेची प्रश्न मांडणे आमचे काम असल्याचे म्हणत त्यांनी ठाकरे सरकाराला सुनावले.तसेच कोरोनाकाळात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. काही दिवसांवर येऊ घातलेल्या पदवीधर-शिक्षक मतदारसांघाच्या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस हे सध्या आपल्या उमेदवाराचा प्रचार करत असून या निवडणुकीत भाजपच जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान मोदींनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता.यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात भाजपकडून सुरू असलेल्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली होती. कोरोनाची लाट पुन्हा येत असताना अशा परिस्थितीत केंद्राच्या सुचनेनुसार योग्य ती खबरदारी घेऊन आम्ही जनजीवन पुर्वपदावर आणत आहोत. मात्र काही राजकीय पक्ष जनतेच्या जीवाशी खेळत आरोग्याचे नियम मोडीत काढत रस्त्यावर उतरून आंदोलने करीत आहेत. त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी, अशी सूचना उद्धव ठाकरेंनी केली होती.

राज्यातील निष्क्रिय सरकारविरूद्ध जनतेत मोठा रोष आहे.शेतक-यांना कोणतीही मदत मिळाली नाही. वीजबिलांचा घोळामुळे मोठा असंतोष आहे आणि तो या निवडणुकीतून व्यक्त होईल असेही फडणवीस यांनी सांगितले.मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडून केवळ वेळकाढूपणा चालू आहे. त्यामुळे केवळ मराठाच नाही,तर सा-याच समाजातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान केले जात आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत प्रारंभीपासून सरकारने लक्षच दिले नाही अशीही टीका त्यांनी केली.आमच्या सरकारच्या काळात गुजरातपेक्षा अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली.महाराष्ट्राला क्रमांक एकवर वर आणले.आम्ही टीका केली की महाराष्ट्रद्रोही ठरत नाही.जनतेला सारे काही समजते.शिवाय, शिवसेना म्हणजे महाराष्ट्र असा समज त्यांनी करून घेऊ नये असा टोलाही त्यांनी लगावला.आज आम्ही सक्षम विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत.सरकार पडण्याची वाट पाहत बसलेलो नाही.अशी अनैसर्गिक सरकारे फार काळ चालत नाहीत.ज्यादिवशी हे सरकार पडेल, त्यादिवशी एक सक्षम सरकार राज्याला देऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Previous article‘या’ १२ जणांना आमदार करा; माजी राज्यमंत्र्यांची राज्यपालांकडे शिफारस
Next articleफडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन करताना अजित पवारांना २८ आमदारांचा पाठिंबा होता