मुंबई नगरी टीम
मुंबई : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना आणि काँग्रेस यांचे सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच गेल्या वर्षी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीने राजकीय भूकंप झाला होता.त्यावेळी भाजपासोबत जाताना अजित पवार यांना २८ आमदारांचा पाठिंबा होता असा गौप्सस्फोट प्रियम गांधी यांच्या ट्रेडिंग पावर या पुस्तकातून करण्यात आला आहे.प्रियम गांधी यांनी आज टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत अनेक राजकीय गोष्टींचा उलघडा केला आहे.
भाजपला वगळून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेच्या वेळी राजभवनावर शपथविधी सोहळा पार पडला या शपथविधीमुळे राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला होता. फक्त ८० तास टिकलेल्या या सरकारच्या स्थापनेमागील इनसाईड स्टोरी लेखिका प्रियम गांधी यांच्या पुस्तकातून समोर आली आहे.प्रियम गांधी यांनी आज टीव्ही ९ मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ट्रेडिंग पावर या पुस्तकातील गोष्टींवर भाष्य केले आहे. राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी जयंत पाटील यांची निवड केल्यानंतर अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.त्यावेळी अजित पवार यांना २८ आमदारांचा पाठिंबा होता असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर याला तडा गेल्याचे प्रियम गांधी यांनी नमूद केले.
एकीकडे महाविकास आघाडीची घोषणा होत असतानाच दुसरीकडे नोव्हेंबर पहिल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे दोन ज्येष्ठ नेते देवेंद्र फ़डणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षावर गेले होते.यावेळी या दोन नेत्यांनी शरद पवार यांना भाजपाला पाठिंबा द्यायचा असल्याचे संकेत दिले होते. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लगेच याची माहिती अमित शाह यांना माहिती दिली.या घडामोडीनंतर दुस-याच दिवशी अमित शाह यांच्या निवासस्थानी शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाल्याचा दावा प्रियम गांधी यांनी केला.या बैठकीत शरद पवार यांनी भाजपला पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली.त्यानंतर पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतल्याचे प्रियम गांधी म्हटले.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू होता तेव्हा शरद पवार यांच्या या खेळी कोणीही समजू शकले नाहीत. राज्यात आघाडीचे सरकार स्थापन करताना काँग्रेस आणि शिवसेना अनेक गोष्टींचा त्याग करण्यास तयार होते. त्यामुळे सत्ता स्थापनेत राष्ट्रवादीला महत्व आल्याने शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय बदलला असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.जेव्हा शरद पवार यांनी हा निर्णय बदलला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या विरोध दर्शविला होता तर तीन पक्षांचे सरकार चालणार नाही असे अजित पवारांचे यावेळी मत होते.त्यांनतरही अजित पवार हे भाजपसोबत सरकार स्थापनेस उत्सुक होते असा दावा प्रियम गांधी यांनी केला आहे.
या घडामोडी सुरू असतानाच अजित पवार यांनी फडणवीस यांची भेट घेवून सरकार स्थापनेबाबत चर्चा केली.मात्र फडणवीस यांनी हे खरं आहे का असा सवालही केला.याला अजित पवार यांनी होकार देत आपल्याला २८ आमदारांचा पाठिंबा असून अजून काही आमदार समर्थन देणार असल्याचे सांगितले.त्यांनतर राष्ट्रवादीच्या एका जेष्ठ नेत्यांसोबत या दोघामध्ये चर्चा घडवून आणली.दुसरीकडे २२ तारखेला नेहरू सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांची महत्वपूर्ण बैठक पार पडली ही बैठक संपताच अजित पवार यांनी फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थान गाठले.या बैठकीनंतर फडणवीस यांनी अमित शहा यांच्याशी चर्चा करून माहिची दिली.आपल्याला सरकार स्थापनेचा दावा लगेच करावा लागेल असेही फडणवीस यांनी सांगितले.त्यांनतर शहा यांनी राज्यपालांकडे समर्थनाचे पत्र घेऊन दावा करा अशा सूचना दिल्या.मी राष्ट्रपती शासन कसे हटवता येईल हे पाहतो. राष्ट्रपती शासन हटवण्यासाठी आवश्यक असलेल्या मंत्रिमंडळाची बैठक घेण्यासाठी त्यावेळी वेळ नव्हता.केंद्रातून त्यांचे प्रयत्न सुरू असतानाच त्याचवेळी राजभवनात शपथविधीची तयारी सुरू झाली. अजित पावारांकडे आमदारांच्या सह्या असलेले पत्र होते.त्यावेळी त्यांनी राज्यपालांनी दावा स्वीकारला आणि राष्ट्रपती शासन हटवले गेले आणि पहाटेच्या वेळी फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी पार पडला असेही गांधी यांनी नमूद केले.