मुंबई नगरी टीम
रत्नागिरी : राज्यातील महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती झाली, पण जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. ठाकरे सरकार हे कामात शून्य आहे, असे म्हणत भाजपचे खासदार नारायण यांनी सत्ताधाऱ्यांवर पुन्हा प्रहार केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आले आणि कोरोना आला, हा त्यांचा पायगुण आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यांनंतर आता नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारला धारेवर धरले.
महाविकास आघाडी सरकारने नुकतेच एक वर्ष पूर्ण केले आहे. या पार्श्वभूमीवर ‘सामना’च्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक अभिनंदन मुलाखत प्रदर्शित करण्यात आली होती. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी वारंवार टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना चांगलेच खडेबोल सुनावले होते. त्यानंतर आता भाजप नेते पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारच्या वर्षभरातील कामाचा लेखाजोखा मांडत आहेत. ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली, पण जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच कोरोना आला. कोरोनामुळे संपूर्ण राज्यात हाहाःकार उडाला आहे, असे राणे यांनी म्हटले. कोरोनामुळे महाराष्ट्रात ५० हजार लोकांचा मृत्यू झाला. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील मृतांची संख्या सर्वाधिक आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी नारायण राणेंनी कोरोनाच्या नावाखाली ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा गंभीर आरोप देखील केला आहे. कोरोना उपाय योजना करण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. कोरोनाच्या नावाने राज्यात ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुलाखतीत विरोधकांना हात धुवून मागे लागू असा, धमकी वजा इशारा दिला होता. कुणाच्या विरोधात मागे लागणार हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावे, असा पलटवार नारायण राणेंनी केला आहे. जनतेच्या मागे हात धुवून लागण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात का? असा सवाल करत हे पापी सरकार असल्याची टीका राणेंनी केली आहे.