प्रत्येक निवडणूक ही परीक्षा,त्यात आम्ही निश्चित पास होऊ : देवेंद्र फडणवीस

मुंबई नगरी टीम

नागपूर : राज्यातील विधान परिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी निवडणूक पार पडली. अनेक राजकीय नेत्यांनी यावेळी मतदान केले. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागपुरात मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत आपल्या उमदेवराना चांगले यश मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच प्रत्येक निवडणूक ही परीक्षा असून त्यात आपण निश्चित पास होऊ, असा दावाही त्यांनी केला आहे. मतदानानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

मला विश्वास आहे की, आम्हाला अतिशय चांगले समर्थन या निवडणुकांमध्ये मिळालेले आहे. निवडणुकांचा निकाल आल्यानंतर एक चांगले यश आम्हाला या ठिकाणी प्राप्त होईल हा मला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुढे ते म्हणाले की, प्रत्येक निवडणूक ही परीक्षाच असते. ही असेल किंवा पुढची निवडणूक असेल. पण मला विश्वास आहे की, या परीक्षेत आम्ही निश्चित चांगल्याप्रकारे पास होऊ. विधान परिषदेच्या निकालाने राज्याचे राजकारण बदलत नसते, पण त्याच्यावर नक्कीच काही ना काही परिणाम होत असतो. त्यामुळे तो परिणाम आपल्याला पाहायला मिळेल, असे सूचक विधानही देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले. ३ डिसेंबरला निवडणुकीचे निकाल हाती येणार आहेत. यंदाची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढत असून विरोधकांना चांगलीच टक्कर मिळाली आहे. त्यामुळे भाजपसाठी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. निवडणूक प्रचारादरम्यान देखील भाजप नेत्यांनी पाचही जागेवर आपले उमेदवार निवडणूक येतील, असा विश्वास व्यक्त केलेला. तर सत्ताधारी नेत्यांनीही कंबर कसून जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालांची उत्सुकता आता लागून राहिली आहे.

Previous articleराज्यातील कोणतेही उद्योग राज्या बाहेर जाणार नाहीत : मुख्यमंत्र्यांचा विश्वास
Next articleअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत प्रवेश