मुंबई, दि. 13 : संरक्षण साहित्यांचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी पोषक वातावरण असून अशी गुंतवणूक झाल्यास भारत आणि स्वीडन यांच्यातील संबंध आणखी मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्वीडनचे संरक्षणमंत्री पीटर हल्टक्विस्ट यांच्याशी झालेल्या भेटीत व्यक्त केला.
स्वीडन दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संरक्षणमंत्री श्री. हल्टक्विस्ट यांची भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांमध्ये विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. भारतासोबत दीर्घकालीन मैत्रीच्या वचनबद्धतेचा पुनरूच्चार केल्याबद्दल श्री. हल्टक्विस्ट यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आणि ही मैत्री भारतासाठीही अतिशय मोलाची असल्याचे त्यांना आवर्जून सांगितले. याबरोबरच स्वीडनमधील संरक्षण साहित्याचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक आहे. संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक आकृष्ट करण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र निधी स्थापन केला असून असा निधी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्याचेही त्यांनी सांगितले. स्वीडन आणि भारत हे एकमेकांसाठी परस्परपूरक देश असून स्वीडनकडे तंत्रज्ञान आहे आणि ते उपयोगात आणण्याची मोठी ताकद आज भारताकडे आहे. त्यामुळे हे दोन देश एकत्र आले तर त्या समीकरणाचा दोन्ही देशांना मोठा लाभ होईल,असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.