मुंबई नगरी टीम
मुंबई : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यानंतर युपीएचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे दिले जाण्याची चर्चा कालपासून सुरू होती. तसे वृत्त देखील माध्यमांत झळकले होते. मात्र आता खुद्द शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया देत यामध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे.सर्व विरोधी पक्षांना एकत्रित करून त्यांचे नेतृत्व करण्याची धमक शरद पवारांमध्ये आहे.त्यामुळे येत्या काळात पवारांना युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाण्याची चर्चा होती.
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशातील काही विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींची भेट घेतली होती. यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांनी ही भेट घेतली असल्याचे समोर आले होते. त्यानंतरच अनेक चर्चांना तोंड फुटले होते. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाीठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र आले आणि अधिक संख्याबळ असणा-या भाजपला विरोधात बसावे लागले, याचे श्रेय शरद पवारांना दिले जाते. महाविकास आघाडीचा हा प्रयोग महाराष्ट्राने स्वीकारला आहे. तर असाच प्रयोग देशपातळीवर देखील केला जावा आणि त्याचे नेतृत्व शरद पवारांनी करावे, अशी मागणी असल्याची चर्चा होती. परंतु युपीएच्या अध्यक्षपदासंदर्भातील बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे शरद पवारांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून देखील या वृत्ताचे खंडन करण्यात आले आहे. परंतु असे असले तरी युपीएला शरद पवार यांच्यासारख्याच नेतृत्वाचीच गरज असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बोलून दाखवले आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावर भाष्य करत म्हटले की, “शेतकरी, कामगारांवर अन्याय होत आहे. देशातील खासगीकरण वाढवण्यावर भर असणा-या भाजपविरोधात आज जनमत तयार झाले आहे. आज सोनिया गांधी या सर्वांना एकत्रित करून काम करत होत्या. मात्र यासर्वांचे पुढे नेतृत्व करण्याची तयारी सोनिया गांधी यांची आहे का हे माहित नाही. पण सोनिया गांधी आणि काँग्रेसने काही सूचना केली आणि शरद पवारांवर जबाबदारी टाकली तर, मला वाटते की, शरद पवारांसारखा उत्तुंग आणि दीर्घ अनुभव असणारा नेता या देशातील सरकारच्या चुका प्रभावीपणे मांडण्याचे काम करेल. पंरतु हा सर्वस्वी युपीएचा निर्णय असून आपण यावर मत प्रदर्शन करणार नाही”, असे ते म्हणाले.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले की, युपीएच्या नेतृत्वासंदर्भात अद्याप कुठलीही चर्चा नाही. शरद पवार यांनीही तशी इच्छा दर्शवली नाही. याबाबत पुढे कोणता निर्णय होईल तो सगळे मिळून घेतील. पण, ज्या पद्धतीने शरद पवार यांनी महाराष्ट्रात जे अशक्य होते ते केले. शिवसेना, काँग्रेस एकत्र येईल असा कोणी विचारही केला नव्हता. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो, विधान परिषदेच्या निकालांवरून हे लक्षात येते की, महाविकास आघाडीच्या प्रयोगाला महाराष्ट्राने स्वीकारले आहे. त्यामुळे देशात हा प्रयोग झाला तर निश्चित रूपाने जनता स्वीकारेल.