“काँग्रेस” संपवण्याचा मोठा डाव, शरद पवारांचे नाव त्याचाच एक भाग

मुंबई नगरी टीम

मुंबई : युपीएचे अध्यक्षपद सोपवण्याच्या चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र इतक्यावरच हा विषय थांबलेला नाही. त्यातील आणखी काही गोष्टींचा खुलासा होताना दिसत आहे. शरद पवार यांच्या युपीए अध्यक्षपदाच्या चर्चेमागे राहुल गांधी यांच्याविरोधात मोठे षडयंत्र रचले जात आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते माजी खासदार संजय निरुपम यांनी केला आहे. तसेच काँग्रेस संपवण्याचा हा मोठा डाव असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

शरद पवारांकडे युपीएचे नेतृत्व दिले जाण्याची चर्चा गुरुवारपासून रंगली होती. मात्र यामध्ये काही तथ्य नसल्याचे स्वतः शरद पवार आणि राष्ट्रवादीने देखील स्पष्ट केले. पंरतु ही चर्चा रंगण्यामागे काय कारस्थान आहे याबाबतचा खुलासा संजय निरुपम यांनी केला आहे. “दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत राहुल गांधी यांच्याविरोधात जे अभियान चालू आहे, शरद पवार यांना युपीएचा अध्यक्ष करण्याची चर्चा हा त्याचाच एक भाग आहे. याच अभियानांतर्गत २३ सह्यांचे पत्र लिहले गेले होते. त्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्याची उणीव शोधण्यात आली. काँग्रेस संपवण्याचा एक मोठा प्लान चालू आहे”, असे ट्वीट संजय निरुपम यांनी केले आहे.

दरम्यान, काँग्रेसला पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वात बदल केला जावा, अशी मागणी पक्षातील नेत्यांनी केली होती. त्यासाठी ऑगस्ट महिन्यात काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांसह २३ जणांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना सविस्तर पत्र लिहले होते. काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलाची आवश्यकता असल्याचे या पत्राद्वारे अधोरेखित करण्यात आले होते. त्यानंतर नुकत्याच शरद पवार यांनी एका मुलाखतीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयी वक्तव्य केले होते. ही सगळी पार्श्वभूमी पाहता संजय निरुपम यांनी आपल्या ट्वीटमध्ये बरेच काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्या या आरोपांवर राष्ट्रवादी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Previous articleमाझ्या घरातील सगळ्या व्यक्ती नका हो फोडू ; पंकजा मुंडेंचा रोहित पवारांना टोला
Next articleजे होईल ते पवारांच्या इच्छेनुसार होईल, युपीए अध्यक्षपदावरून नवनीत राणांची प्रतिक्रिया