शरद पवारांच्या वाढदिवसाला अनोखी भेट;बार्टीच्या कल्याणकारी योजनांची माहिती एका क्लिकवर

मुंबई नगरी टीम

मुंबई : खासदार शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ‘महाशरद’ या दिव्यांग सहाय्यक उपकरणासंबंधीच्या ॲप्लिकेशन सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) चे ‘ई-बार्टी’ हे मोबाईल ॲप्लिकेशन तयार केले आहे. उद्या १२ डिसेंबर रोजी याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुंडे म्हणाले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत बार्टी संस्था कार्यरत असून याअंतर्गत शैक्षणिक विकासाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. डिजिटल युगात राज्यात स्मार्टफोन मोबाईलधारकांची संख्या कोट्यवधीच्या घरात असून,बार्टी अंतर्गत सुरू असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनसामान्यांना कमीत कमी वेळेत,आपल्या मोबाईलवर एका क्लिकमध्ये मिळावी या दृष्टीने हे अॅप तयार केले असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

म-गव्हर्नन्सद्वारे बार्टी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, अधिछात्रवृत्ती, सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना येरवडा शाळेत दिले जाणारे मोफत प्रवेश आदी सर्व बाबींचा या अॅपमध्ये समावेश करण्यात आला आहे.ई बार्टी या अॅपमध्ये डिजिटल लायब्ररी सुरू करून त्यात शासनाचे अहवाल, सामाजिक न्याय विभागाशी निगडित साहित्य, राज्यातील पुरोगामी समाजसुधारकांचे विचार व साहित्य मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र प्रक्रियादेखील या अॅपमध्ये समाविष्ट करण्यात आली असून, विविध जातीच्या सर्वेक्षणासाठी लागणारी माहिती संकलित करण्यासाठीही हे ॲप्लिकेशन उपयुक्त ठरणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.ऑनलाईन तक्रार निवारण, अभिप्राय आदी सुविधा उपलब्ध असलेल्या अॅपमुळे किती प्रमाणात जनतेला विविध योजनांचा लाभ मिळत आहे याची आकडेवारीही यातून स्पष्ट होणार आहे.बार्टीचे कामकाज पूर्ण क्षमतेने वाढवावे, सामान्य व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येक योजना मोबाईलवर पोचवावी या उद्देशाने व खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे अॅप लोकार्पित होत असल्याचा मनस्वी आनंद असल्याचे यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री मुंडे यांनी सांगितले.

खासदार शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील दिव्यांग व्यक्तींना एक अनोखी भेट दिली आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत दिव्यांग व्यक्तींना विविध सहाय्यक उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाशरद’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला असून उद्या १२ डिसेंबर रोजी याचे लोकार्पण करणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली.दिव्यांग व्यक्तींना विविध आधुनिक उपकरणे वापरून सामान्य व्यक्तिप्रमाणे जीवन व्यथित करण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. बाजारात ब्रेल किट, श्रवण यंत्र, कृत्रिम अवयव, बॅटरीवर चालणारी व्हील चेअर अशी दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार अनेक प्रकारची सहाय्यक उपकरणे उपलब्ध असतात, परंतु प्रत्येकाला ती विकत घेणे शक्य होत नाही.समाजात अनेक दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, खासगी कंपन्या, उद्योजक असे अनेक घटक दिव्यांग व्यक्तींना असे उपकरण उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक असतात, या गरजू दिव्यांग व्यक्तींची व दात्यांची सांगड घालून देण्याचे काम महाशरद या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

महाशरद’ प्लॅटफॉर्म वर नोंदणी करण्यासाठी www.mahasharad.in हे संकेतस्थळ शुक्रवारी सुरू होत असून मार्च -2021 अखेरपर्यंत मोबाईल ॲप्लिकेशन स्वरूपात देखील हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येईल.महाशरदचा ‘महाराष्ट्र स्टेट हेल्थ रिहॅबिलिटेशन अँड असिस्टंस फॉर दिव्यांग’ असा विस्तार असून खासदार श्री.पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून याचे लोकार्पण करताना आपल्याला अत्यंत आनंद होत आहे. या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून सुमारे २९ लाख दिव्यांग व्यक्तींपर्यंत मदत पोचवण्याचे आपले लक्ष्य असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.महाशरद हे डिजिटल प्लॅटफॉर्म पोर्टल सुरू झाले असून ते अँड्रॉइड ॲप्लिकेशन च्या स्वरूपात प्ले-स्टोअर वर उपलब्ध करण्यात येणार आहे, विभागातील अधिकारी, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, दिव्यांग वित्त महामंडळ यातील अधिकारी,कर्मचारी यांनी अत्यंत कमी वेळेत ‘महाशरद’ प्लॅटफॉर्म साकारला असून, याचे मोबाईल ॲप्लिकेशन मार्च २०२१ पर्यंत प्ले-स्टोअर वर उपलब्ध होईल; मुंडे यांनी यासाठी त्यांचे कौतुक देखील केले.१२ डिसेंबर पासून गरजू दिव्यांग नागरिक तसेच इच्छुक दात्यांना या पोर्टल वर नोंदणी करता येणार असून, कोणत्या प्रकारची मदत, सहाय्यक उपकरण किंवा अन्य साहाय्य आवश्यक आहे याबाबत दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार यावर सविस्तर वर्गीकरण देण्यात आले आहे.

Previous articleस्थानिक स्वराज्य संस्थांनी वीज बिलाचे थकविले ७२०८ कोटी रुपये
Next articleसरकारी कर्मचा-यांना कार्यालयात जीन्स टी-शर्ट,रंगीत कपडे आणि स्लिपर वापरण्यास बंदी