मुंबई नगरी टीम
मुंबई : येत्या काही वर्षात राज्यातील प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार काम करणार असून,यासाठी वेगळा निधी राखून ठेवला जाईल,अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत करीत,यावरून समजेल आम्ही हिंदुत्व सोडले नाही,असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
दोन दिवसाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केलेल्या भाषणात विरोधी पक्ष भाजपाचा खरपूस समाचार घेत टोले लगावले.कोरोनाची परिस्थिती हाताळण्यावरूनआमच्यावर टीका करण्यात आली.राज्याने पहिल्या दिवसापासून एकही आकडेवारी लपवली नाही.विरोधकांनी टीका जरुर करावी आम्हाला यावर काहीही आक्षेप नाही.मात्र आपल्या धारावी मॉडेलचे कौतुक जगाने केले.जी गोष्ट डब्ल्यूएचओला दिसली,वॉशिग्टंन पोस्टला दिसली ती तुम्हाला दिसली नाही याचे वाईट वाटते, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. डॉक्टरांचे टास्क फोर्स निर्माण करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजनाही महाराष्ट्रात योग्य पद्धतीने राबवण्यात आली. याचेही कौतुक करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.महाराष्ट्रातील गडकिल्ले ही आपली ओळख आहे, हा प्रदेश देवदेवतांचा साधुसंतांचा आहे. प्राचीन मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी तसेच सांस्कृतिक ठेव्याचे जतन करण्यासाठी निधी राखून ठेवला जाईल आपण सहकार्य करावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.या वरून आम्ही हिंदुत्व सोडले नाही,हे देखील लक्षात येईल असा टोला मुख्यमंत्री ठाकरे भाजपला लगावला.
प्रताप सरनाईक यांच्या मागे ईडी लावली,त्यांच्या मुलांच्या मागे लावली,नातू असता तर त्याच्या मागेही लावली असती.ही विकृती आहे, या राजकारणाला आम्ही महाराष्ट्रात थारा देणार नाही.ईडी, सीबीआयचा घरातील नोकरासारखा वापर करून राजकारण आपल्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला.कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या जागेची मालकी राज्याची असून,जागाही राज्याची आणि प्रकल्प देखील राज्याचा आहे असे सांगतानाच, बुलेट ट्रेन कोणाच्या फायद्यासाठी आहे ? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. राज्याच्या हिताच्या आड राजकारण नको. विरोधाला विरोध करता कामा नये. राज्याला मातीत घालणारे राजकारण बंद केले पाहिजे, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी वविरोधकांना सुनावले.
विरोधकांच्या सर्वच आरोपांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही,माझ्या सहकारी मंत्र्यांनी यांची उत्तरे दिली आहेत असे सांगून,तुम्ही मानगुटीवरच बसायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही काही करु शकणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असून,ही लढाई आम्ही जिंकणारच,पण ही लढाई लढत असतानाइतर समाजाचे आरक्षण काढणार असे कुणी तरी टुमणं काढले.मात्र मराठा आरक्षण देताना अन्य कुणाचेही आरक्षण काढणार नाही अशी ग्वाही देतो असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.समाजात जे कोणी आग लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर पाणी टाकावेच लागेल असा इशाराही त्यांनी आपल्या भाषणात दिला.मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचाही समाचार यावेळी घेतला.गेल्या पाच वर्षांमध्ये कुंडल्या बघणारे आणि मागच्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तकं आणि अहवाल वाचू लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला.फडणवीस यांनी दिल्लीच्या राजकारणात सक्रिय व्हावे असे मला वाटतं, मला वाटतं की ही सुधीर मुनगंटीवार यांचीही हीच इच्छा आहे असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हणताच, त्यावर अध्यक्ष नाना पटोले यांनी आमच्या मित्राच्या मागे का लागता असा मिश्किल सवाल मुख्यमंत्र्यांना केला.तुम्ही इथेच थांबा तुम्ही कुठे जाऊ नका. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.